‘एकदंताय.. वक्रतुंडाय.. भालचंद्राय’ अशा विविध नावांनी परिचित असलेला बाप्पा ‘भाव तसा देव’ या उक्तीनुसार विविध रुपात भाविकांच्या भेटीला आला आहे. पारंपरिक सनातन बैठकीपासून आजच्या काळातील छोटा भीम, महाबलीपर्यंत रुप धारण केलेल्या बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे. काहींनी आपल्या पारंपरिक रुपाला आणि शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य दिले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा मूर्तीचे दर आहे तसेच राहिल्याने भाविकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
गुरूवारी बाप्पाचे आगमन होणार आहे. त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतांना साजेशी मूर्ती मिळवण्याचा सर्वाचा प्रयत्न आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सिंहस्थातील तिसरी शाही पर्वणी असल्याने भाविकांसह विक्रेत्यांची धांदल उडणार आहे. या काळात भाविकांची गर्दी होत असल्याने बाप्पाला चतुर्थीच्या आधीच घरी आणण्याकडे अनेकांचा कल आहे. शहर व परिसरातील बाजारपेठा गणेश मूर्तीची दालने आणि सजावट, पूजा साहित्याने सजल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई, सिध्दी विनायक, बालाजी गणेश, बालगणेश, पगडी गणेश, साई गणेश, पेशवाई मयुर, सनातन बैठकांवर विराजमान गणराय आदी गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. त्यात यंदा जुने नाशिक परिसरातील ‘मोदकेश्वर’ आणि गजमुख गणेश सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. या शिवाय ‘सरस्वती गणेश’ यंदाचे खास आकर्षण आहे. यंदा ‘महाबली’ या अफाट गाजलेल्या चित्रपटातील पात्राचे रुपही मूर्तीमधून उमटले आहे. गणेशासह सरस्वती, कृष्ण यांचा संगम या रूपात पहावयास मिळतो. नाशिककरांकडून मोदकेश्वरला चांगली पसंती मिळाल्याचे सुलाई माता कला केंद्राचे किरण येवले यांनी सांगितले. या शिवाय मद्रास गणपती, कल्याण कोच, मुंबई महाराजा, राजस्थान फेटा गणेश, चिंचपोकळीचा राजा या मूर्तीही उपलब्ध आहेत.
मूर्तीमध्ये विशेषत: पद्मासन आणि टिटवाळा बैठकीसह लालबागच्या राजाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. बच्चे कंपनीमध्ये बाल गणेशाची धूम असली तरी पालकांमध्ये ‘कार्टुन’ रूपातील गणरायाला घरी आणण्याची मानसिकता नाही. यामुळे बाल गणेशाची आवड असली तरी या मूर्तीला अत्यल्प मागणी असल्याचे श्रीकला मंदिरचे अमोल खांबेकर यांनी नमूद केले. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) तुलनेत शाडू मातीच्या मूर्तीना ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असल्याचे विक्रेते मयुर मोरे यांनी सांगितले. शाडू मातीच्या मूर्ती तुलनेत महाग असतात. पर्यावरणस्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची बहुतेकांची इच्छा असली तरी आर्थिक बाबींमुळे ‘पीओपी’च्या मूर्तीना काही पसंती देतात, असे विक्रेत्यांनी सांगितले.
गतवर्षीच्या तुलनेत गणेश मूर्तीच्या किंमतीत वाढ झालेली नाही. स्थानिक संस्था करातुन सुटका आणि इंधनाचे दर कमी होत असल्याने कच्चा माल आणणे सोयीस्कर ठरले. परिणामी मूर्तीचे दर स्थिर राहण्यास मदत झाल्याचे खांबेकर यांनी सांगितले. मूर्तीवर कर नसला तरी त्या तयार करण्यासाठी लागणारी माती, कच्चा माल, इतर साहित्य यावरील करात काही अंशी वाढ झाली आहे. तसेच मजूरी, वाहतूक खर्चात वाढ झाल्याने मूर्तीची किंमत किरकोळ स्वरूपात वाढल्याचे काही विक्रेते सांगतात. नाशिक, पेण, सावंतवाडी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, अहमदनगर या भागातून मूर्ती शहरातील बाजारपेठेत आल्या आहेत. ‘पीओपी’च्या मूर्ती ५० रुपयांपासून ते २० हजार रूपयांपर्यंत आहे तर शाडूमातीच्या मूर्ती ४०० रुपयांपासून आठ ते १० हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. सालकृंत मूर्ती भाविकांच्या मनावर मोहिनी घालत असली तरी त्याची किंमत प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी नाही. यावर उपाय म्हणून काही ठिकाणी गणेशमूर्तीना कुंदन, ‘आय लॅशेस’, ‘कुंदन वर्क’ याचीही खास सजावट करून देण्यात येत आहे. याकरिता आपल्याला अपेक्षित सजावटीप्रमाणे त्याची किंमत आकारली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेलकम सहकार्य मंडळाचा अनोखा उपक्रम
जुने नाशिक परिसरातील वेलकम सहकार्य मित्र मंडळाच्यावतीने सिंहस्थ पर्वणीमुळे अडचणीत असलेल्या विक्रेत्यांना सोमवार पेठ परिसरात मंडळाच्यावतीने ‘वेलकम सहकार्य मंगलमूर्ती दालन’ खुले करून देण्यात आले आहे. या दालनात पेण, टिटवाळा, नगर येथील शाडू मातीच्या, मुलतानी मातीच्या हळद व गेरू यांनी रंगविलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती भाविकांना अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातून मिळणाऱ्या नफ्यातून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष भूषण कनोजे यांनी सांगितले.

More Stories onनाशिकNashik
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh idols in market
First published on: 16-09-2015 at 09:59 IST