संघाच्या धर्मजागरण विभागाच्या हिंदू संमेलनातील मत
घरवापसीचा उपक्रम चांगला आहे. मात्र, त्याचा वेग दुप्पट होण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण समन्वय विभागाचे क्षेत्रीय प्रमुख शरदराव ढोले यांनी व्यक्त केले. कुंभमेळ्यानिमित्त येथील पंचवटी महाविद्यालयात आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते.
यावेळी स्वामी लक्ष्मणदास, स्वामी ब्रम्हगिरी, स्वामी सिध्देश्वर, संत रविदास आदी महंतांसह प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात, प्रांत धर्मजागरण प्रमुख हेमंतराव हरहरे, अखिल भारतीय धर्म जागरण विभागप्रमुख मुकुंदराव पणशीकर आदी उपस्थित होते. मानववंश शास्त्र सव्‍‌र्हेक्षणाचा उपयोग करून अल्पसंख्याकांनी धर्मातर जातीनिहाय करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप ढोले यांनी केला. त्यांनी सांगितले की, ‘पीपल ऑफ इंडिया’ प्रकल्पाचा उपयोग करून भारतातील प्रत्येक जातीचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र अल्पसंख्याकांनी आखले आहे. या सर्व गोष्टीचा धर्मजागरण समन्वय विभागाने अनुसूचित जाती, जनजाती आणि विशेष मागासवर्ग या समाजात धार्मिक अस्मिता जागृत करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ८४२ जातींमध्ये अल्पसंख्याकांकडून धर्मातराचे प्रयत्न होत असताना ते थांबविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून धर्मजागरण विभागाने आजच्या हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे.
सध्या दरवर्षी दोन ते अडीच लाख लोकांची घरवापसी होत आहे. तरीही जनगणनेच्या आकडेवारीनुसार प्रत्येक दहा वर्षांत हिंदुंची संख्या घटत आहे. प्रत्येक वर्षी एक कोटी हिंदू घटत आहेत. हे थांबले पाहिजे व गेलेले परत आले पाहिजेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी पाच लाख लोकांची घरवापसी होणे आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांत देशात १६ लाख कोटी रुपये काही संस्थांना धर्मातरासाठी विदेशातून आल्याचे ढोले यांनी नमूद केले. दरम्यान, याच ठिकाणी झालेल्या वंशावळी संमेलनात वंशावळी परंपरेने एक हजार वर्षे गुलामगिरीत राहिल्यावरही भारताचे मूळ राष्ट्रीय दर्शनचे अस्तित्व वाचविल्याचे अखिल भारतीय वंशावळी लेखक संरक्षक आणि संवर्धन सभा अध्यक्ष महेंद्र दास बोरारजी यांनी सांगितले. भारतीय वंशावळी लेखकांच्या जवळ प्रत्येक जातीचा इतिहास सुरक्षित आहे. पण, प्रोत्साहन न मिळाल्यामुळे या परंपरेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मोडी लिपी वाचविणे हे नव्या पिढी समोरील आव्हान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.