जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर कमी होऊन काही प्रमाणात स्थिरावले होते. मात्र, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातुंनी ग्राहकांना पुन्हा दणका दिला. एकाच दिवसांत मोठी दरवाढ नोंदवली गेल्याने चांगलीच खळबळ उडाली.

गेल्या आठवडाभरापासून सुवर्ण बाजारपेठेत चढ-उताराचे वातावरण कायम राहिले आहे. लग्नसराई सुरू झाल्यानंतर काही दिवस सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती, तर काही दिवस किंमतींमध्ये किंचित घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांच्या हालचाली, या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम सोन्याच्या दरावर दिसून आला. आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किंमतीत थोडीशी घट नोंदवली गेली असली, तरी ही घसरण मर्यादित स्वरूपाची राहिली. मात्र, आता लग्नसराई सुरू झाल्याने सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातून सोने आणि चांदीसाठी मजबूत संकेत मिळाल्याने देशांतर्गत बाजारात मागणी वाढली आहे.

ऑक्टोबरमध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतीत थोडी घट दिसून आली होती. अलिकडच्या काळात झालेल्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल वाढती चिंता. गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. फेडच्या संभाव्य दर कपातीमुळे गुंतवणूकदारांची भावना बदलली आहे. कमी व्याजदराच्या वातावरणामुळे सोने आणि चांदीसारख्या व्याज नसलेल्या मालमत्ता अधिक आकर्षक बनतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच सोमवारच्या व्यवहारात एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी चढ-उतार होऊ शकतात. तथापि, लग्नसराईचा हंगाम आधीच सुरू झाला आहे, जो सोन्याला आणखी आधार देईल.

जळगावमध्येही २७ ऑक्टोबरला शहरात सोन्याचे दर एक लाख २६ हजार १७५ रूपयांपर्यंत होते. त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू राहिले. शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ९०९ रूपयांपर्यंत होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल १९५७ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २५ हजार ८६६ रूपयांवर जाऊन पोहोचले.

चांदीत २०६० रूपयांनी वाढ

जळगावमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांवर स्थिरावले होते. मात्र, सोमवारी सकाळी बाजार उघडताच २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.