लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : शहरातील सराफ बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ७७७ रुपयांपर्यंत पोहोचले होते. सोमवारी दुपारपर्यंत ८२४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर ९९ हजार ६०१ रुपयांपर्यंत गेले. हा सोने दराचा नवीन उच्चांक आहे.
अमेरिकेने आयात शुल्कवाढीची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली होती. मात्र, अवघ्या काही दिवसातच सोन्याच्या दराने पुन्हा जोरदार उसळी घेतली. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनाही या कालावधीत मोठा परतावा मिळाला आहे. सोने सर्वकालिन उच्चांकावर पोहोचल्यानंतर संबंधितांना बँकेत वर्षभर पैसे ठेवूनही जितके व्याज मिळाले नसते, त्यापेक्षा जास्त परतावा सोन्यात गुंतवणूक केल्याने मिळाला आहे. अगदी कमी कालावधीत जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने सोन्यात गुंतवणूक करण्याकडे त्यामुळे अनेकांचा ओढा वाढल्याचे सांगितले जात आहे.
अक्षय्य तृतियेचा सण जवळ आलेला असताना मुहुर्तावर सोने खरेदी करता यावे म्हणून ग्राहक दर कमी होण्याची वाट पहात होते. मात्र, अक्षय्य तृतीया जसजशी जवळ येत आहे, त्याप्रमाणे दर आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत. सोने उत्तरोत्तर वाढत असताना, त्यात येत्या काही दिवसात मोठी घट होण्याची आशा सुवर्ण व्यावसायिकांनीही सोडून दिली आहे. दरम्यान, सोने दरातील वाढ अशीच कायम राहिल्यास त्याचा मोठा दूरगामी परिणाम सुवर्ण व्यवसायावर निर्माण होण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
चांदीच्या दरात पुन्हा घसरण
सोने दरात सातत्याने वाढ होत असताना, जळगावमध्ये चांदीचे दर तीन दिवसांपासून प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपयांपर्यंत स्थिर होते. त्यात सोमवारी ७२१ रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर प्रतिकिलो ९९ हजार १८९ रुपयांपर्यंत घसरले.