पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आश्वासन, सराफ बाजार, दही पूल, फूल बाजार दरवर्षी पाण्याखाली

नाशिक : मुसळधार पावसात मध्यवर्ती भागातील सराफ बाजार, दही पूल, हुंडीवाला लेन, शुक्ल गल्ली आणि फूल बाजार पाण्याखाली जाण्याची समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. नैसर्गिकपणे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने ती उद्भवते. यावर अभ्यासांती सरस्वती नाल्यासह पावसाळी गटार योजनेतून कायमस्वरुपी तोडगा काढला जाईल. या प्रकल्पाचा स्मार्ट सिटीत समावेश केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

सोमवारी शहरात सलग तीन ते चार तास मुसळधार पावसाने झोडपले होते. यावेळी सराफ बाजार आणि लगतच्या परिसरात पाण्याचे लोंढे शिरून सर्वत्र पाणीच पाणी झाले. दुकानांमध्ये पाणी शिरून व्यावसायिकांचे नुकसान झाले. तळ, रस्त्यावरील वाहने पाण्याखाली गेली. या पाश्र्वभूमीवर, मंगळवारी भुजबळ यांनी या भागास भेट देऊन कापड, भांडे व्यापारी, सराफ व्यावसायिकांशी चर्चा केली. २००४ मधील महापुरावेळी हा परिसर दोन दिवस पाण्याखाली होता. गोदावरी काठावरील दाट दुकानांचा हा परिसर आहे. पाण्याचा निचरा नैसर्गिकपणे होण्यासाठी पुरेशी जागा, व्यवस्था नाही. पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा व्हावा, यासाठी सरस्वती नाल्यासह पावसाळी गटारीच्या व्यवस्थेबाबत तज्ज्ञांमार्फत अभ्यास केला जाईल. त्यास काहीसा वेळ लागणार असला तरी यावर कायमस्वरुपी तोडगा काढला जाईल, असे भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून हा विषय मार्गी लावता येईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाणी ओसरल्यानंतर व्यापारी, व्यावसायिकांनी उशिरापर्यंत दुकानांची स्वच्छता केली. मंगळवारी सकाळी काही जण स्वच्छता करत होते. भुजबळ आणि नंतर महापौर पाहणीसाठी येणार असल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चिखल, कचरा हटविण्यास प्राधान्य दिले. फुल बाजारातील विक्रेत्यांना हटविण्यात आले. सम-विषमच्या निकषानुसार परिसरातील दुकाने सुरू झाली. कधी वादळी पाऊस येईल आणि पुन्हा अशा स्थितीला तोंड द्यावे लागेल याची चिंता व्यापारी वर्गाच्या चेहऱ्यावर दिसत होती.

 

व्यावसायिकांचा भूमिगत गटार योजनेवर आक्षेप

नाशिक गावठाणातील पूर समस्या आणि अन्य प्रश्नांबाबत सराफ नाशिक गावठाणातील पूर समस्या आणि अन्य प्रश्नांबाबत सराफ असोसिएशन, कापड व्यापारी आणि भांडी व्यावसायिक संघटना यांच्यावतीने पालकमंत्र्यांना संयुक्त निवेदन देण्यात आले. भूमिगत गटार योजना राबविल्यानंतर गावठाण भागात वारंवार पूर येण्यास सुरूवात झाली. यामुळे खरोखर भुयारी गटार योजना राबविली गेली  की अयोग्यरित्या काम झाले, असे प्रश्न करत संघटनांनी शहरातून वाहत येणारे पावसाचे आणि गटारीचे पाणी हे सरस्वती नाल्यात सोडण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे योजनेची वहनक्षमता कमी पडते. वास्तविक ही योजना सीबीएसवरून सारडा सर्कलमार्गे तपोवनात जाणे अपेक्षित होते. मात्र सारडा सर्कलपासून भद्रकाली पंपिंगच्या केंद्रात ती जोडण्यात आली. या केंद्राची पाणी खेचण्याची क्षमता कमी असल्याने हेच पाणी सरस्वती नाल्यातून बाहेर पडून सरस्वती लेन, हुंडीवाला लेन, जिजामाता रोड, सराफ बाजार या भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन लाखो रुपयांचे नुकसान होते, याकडे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी लक्ष वेधले. पावसाळी गटार योजनेचे त्वरित लेखा परीक्षण करावे, या योजनेचा पुनर्विचार होऊन ठोस उपाय योजना कराव्यात, सरस्वती नाल्याची पूर्णत: साफसफाई करावी, गावठाणात कचरा टाकण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध कराव्यात, जिजामाता रस्त्यावरील सुलभ शौचालय परिसराचा अभ्यास करून नव्याने बांधावे अशी मागणी करण्यात आली. महापालिका आणि गावठाणातील व्यापारी आणि रहिवासी यांच्यात दुफळी निर्माण झाली आहे. ती कमी करण्यासाठी गावठाण भागात योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.