आवळखेडकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
नाशिक : जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीला पुरेपूर निसर्गसौंदर्य लाभलेले आहे. मात्र असे असले तरी या तालुक्याची पाणीटंचाई अजून कमी झालेली नाही. तालुक्यातील आवळखेडच्या महिलांना अजूनही पाण्यासाठी कित्येक किलोमीटरवर भटकं ती करावी लागत आहे. विशेष म्हणजे हे गाव इगतपुरीपासून अवघे सात किलोमीटरवर असून या गावाला ना रस्ता ना पाणी अशी गत झाली आहे
सुमारे १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात सरपंच कृष्णा कैवारी, उपसरपंच संदीप पवार यांनी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना निवेदने देऊनही येथील समस्या अजून सुटेना. त्यामुळे आम्ही कोणाकडे जाऊ, असा प्रश्न सरपंच आणि उपसरपंच यांनी केला आहे. जेवायला देऊ नका, पण पाणी द्या, अशी भावनिक मागणी सरपंचांनी केली आहे.
आवळखेड गावात शासनाच्या वतीने एप्रिलपासून दोन टँकर सुरू आहेत. परंतु, १२०० लोकसंख्या असलेल्या या गावाला दोन टँकर पुरेसे नाहीत. त्यातच गावातील विहिरी डोंगराच्या पायथ्याशी असून वयोवृद्ध, गरोदर महिला यांना पाणी आणणे म्हणजे एक आव्हानच असते. या गावातील कोणाला जर तालुक्याच्या ठिकाणी जायचे असेल तर सात किलोमीटरसाठी एक तास लागतो, अशी येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
आवळखेड गावासाठी तीन विहिरी असून यापैकी दोन विहिरी कोरडय़ाठाक पडतात. एका विहिरीला थोडा पाझर असल्याने येथील लोक नंबर लावून त्या विहिरीचे पाणी भरतात. त्याचप्रमाणे शासनाचे दोन टँकर सुरू असून ते पाणी हे पुरत नाही. गावाला पाण्यासाठी दुसरा पर्याय देखील उपलब्ध नाही. धरणावर एखादी योजना राबवली तर या गावाचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल, असे सरपंच आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गेल्या कित्येक वर्षांंपासून आमच्या या आदिवासी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सरपंच गावचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी विविध ठिकाणी तक्रोर मांडली. परंतु, येथील प्रश्न मार्गी लागत नाही.
– कृष्णा कैवारी (सरपंच, आवळखेड, इगतपुरी)
गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हांला एक तास लागतो.
-संदीप पवार (उपसरपंच, आवळखेड)