उजव्या-डाव्या कालव्यांतून लवकरच विसर्

नाशिक : बागलाण तालुक्यातील मोसम खोरे आणि करंजाडी परिसराची तहान भागविणारे हरणबारी मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागल्याने नदीला पाणी आले आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारचे औचित्य साधून बागलाणला वरदान ठरलेल्या या प्रकल्पाचे जलपूजन आमदार दिलीप बोरसे, शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

बागलाण तालुक्यातील मोसम  खोरे परिसरात जलसिंचन, पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेले हरणबारी धरण पूर्ण भरले असल्याची माहिती पाटबंधारे उपविभागाचे अभियंता अभिजीत रौंदळ यांनी दिली. एकू ण ११६६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे असलेले हरणबारी धरण मागील वर्षी १२ ऑगस्टच्या  मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी सहा दिवस आधीच धरण भरल्याने सांडव्याव्दारे ५६ दशलक्ष घनफुट पाणी मोसम नदीत जात असल्याने मोसम खोऱ्यातील गावांना दिलासा मिळाला आहे.

हरणबारी धरणावर मोसम खोऱ्यातील गावांची भिस्त असते. सांडव्यातून जाणारे पाणी बागलाण तालुक्यातील नामपूर ,अंबासनपर्यंत पोहचल्यास धरण प्रकल्पांतर्गत पूर पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यांना सोडण्यात येणार आहे. पश्चिम भागात धरण लाभक्षेत्रात पाऊस होत असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली आहे. सदर धरण परिसरात निसर्गरम्य वातावरण असल्याने ते पाहण्यासाठी पर्यटक येण्यास सुरुवात झाली असून संबंधितांनी धोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढू नये, असे आवाहन अभियंता रौंदळ यांनी केले आहे. सांडव्यातून जाणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ नये तसेच पुढे कालव्यांना सोडण्यात येणारे पाणी वाया जाऊ नये, यावर शाखा अभियंता व्ही. एम. आहेर, दिलीप भदाणे लक्ष ठेवून आहेत

दरम्यान,  बागलाणसाठी वरदान ठरलेल्या या  प्रकल्पाचे जलपूजन कृषिभूषण खंडेराव शेवाळे, नामपूर बाजार समितीचे संचालक कृष्णा भामरे, आदिवासी वनवासी संघाचे प्रदीप बच्छाव,  बागलाणचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, काकडगावचे सरपंच संजय पवार , मुल्हेरच्या सरपंच भारती पवार आदींच्या हस्ते करण्यात आले. हरणबारी धरण क्षेत्रातील बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिके वाचविण्यासाठी हरणबारी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याला तात्काळ पाणी सोडण्याची सूचना आमदार बोरसे यांनी केली. यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजीत रौंदळ यांनी १५ ऑगस्टच्या आत दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येईल, असे नमूद केले. धरणाजवळील हरणबारी शासकीय आश्रमशाळेला  बोरसे यांनी भेट देऊन लसीकरण जास्तीत जास्त के ल्याबद्दल डॉ. वैशाली बावीस्कर यांचा सन्मान केला. आदिवासी दिना निमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

यंदा बागलाण तालुक्याच्या पूर्व भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पिण्याच्या पाण्याचा आणि जलसिंचनाचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नियोजन करण्याची गरज आहे. तसेच धरणामध्ये कित्येक वर्षांपासून गाळ साचलेला असल्याने पाण्याची क्षमता आता कमी झाली आहे. क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे आवश्यक आहे.

– नाना भामरे (माजी सरपंच, भडाणे)