मालेगाव : भक्तगणांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विरोधानंतर ३०० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या येथील किल्ला हनुमान मंदिराची जागा विक्री करण्यासंदर्भात सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांच्या वारसदारांनी आता घुमजाव केले आहे. आमच्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या मंदिराची जागा आम्ही कदापि विक्री करू शकत नाही, असे राजेबहाद्दर कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका इमारतीजवळ सर्वे क्रमांक १०६ मधील एकूण ८८९ चौरस मीटर या क्षेत्रावर किल्ला हनुमान मंदिर, व्यायाम शाळा आणि सेवेकरींसाठी निवासाची व्यवस्था आहे. सरदार नारोशंकर यांनी या मंदिराची स्थापना केल्याचे सांगितले जाते. शासनाकडून संस्थानिकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या गेल्या, तेव्हा मंदिराच्या जागेचा अपवाद वगळता ऐतिहासिक भुईकोट किल्ला, महापालिका इमारत परिसरातील सर्व जागा सरकार जमा झाल्या. या मंदिराच्या जागेचे संपूर्ण क्षेत्र अनेक वर्षांपासून या तिन्ही घटकांच्या कब्जात आणि वहिवाटीत आहे. या क्षेत्रावरील भोगवटदार म्हणून महापालिकेची करपट्टी आणि विजेची देयके या तिन्ही घटकांच्या नावे आहेत. तर, नगर भूमापनच्या ७/१२ उताऱ्यावर या संपूर्ण क्षेत्राच्या मूळमालक सदरी राजेबहाद्दर यांच्या चार वारसांच्या नावे वडिलार्जित मारुती मंदिर अशी नोंद आहे.

एप्रिल महिन्यात राजेबहाद्दर यांच्या दोन वारसदारांनी या जागेची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कमर खान नसीम खान (मालेगाव) या व्यक्तीच्या नावाने जनरल मुखत्यारपत्र करून दिले. त्यानुसार खान यांना या जागेचे खरेदीखत नोंदविण्याचे संपूर्ण अधिकार प्राप्त झाले. त्यावरून ही जागा विक्री करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा संशय आल्यामुळे हनुमान भक्तांमध्ये असंतोष उफाळून आला. त्या विरोधात संबंधितांना वकिलामार्फत नोटीसा पाठवून या जमिनीचा व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर ठरेल, असा इशारा मंदिर व्यवस्थापनाकडून देण्यात आला. या विषयावरून शहरातील वातावरण चांगलेच तापले.

या पार्श्वभूमीवर मंदिराच्या जागे संदर्भात मुख्त्यारपत्र करून देणाऱ्या राजेबहाद्दर यांच्या वंशज राधिका गोसावी आणि देवयानी चित्राव यांनी ही जागा विक्री करण्याचा प्रश्नच नसल्याचे नमूद केले. जनरल मुख्त्यारपत्र रद्द करण्यात आले आहे, मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची इच्छा आहे. ही आमची खासगी मिळकत असून काही लोकांकडून आमची बदनामी करण्याचा तसेच ही जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. परंतु, या जागेचे जनरल मुखत्यारपत्र करून देण्याचे कारण काय, हे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. यापूर्वी शहरातील महालक्ष्मी मंदिराच्या तीनपैकी दोन भुखंडांची विक्री केली गेली. तसेच श्री विठ्ठल रुख्माई मंदिराची जागा विक्री करण्याचेही प्रयत्न झाले. या दोन्ही जागांची मालकी देखील राजेबहाद्दर यांच्या वारसांकडे होती. त्यामुळे या दोन्ही मंदिरांच्या जागांचे दाखले देत किल्ला हनुमान मंदिराच्या जागेसंदर्भात पूर्वीचीच पद्धती वापरण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप हनुमान भक्तांकडून होत आहे.