भरधाव बस  विरुध्द मार्गिकेत शिरल्याने अपघात

मंगळवारी दुपारी देवळा तालुक्यातील मेशी फाटय़ाजवळ झालेल्या भीषण अपघातात २६ जणांना प्राण गमवावे लागले.

बसचे टायर सुस्थितीत; चालकाविरुध्द गुन्हा दाखल

नाशिक : देवळा ते मालेगाव रस्ता सुमारे नऊ मीटरचा आहे. रस्त्याच्या कडा वगळता वाहनांना मार्गस्थ होण्यास साधारणत: सात मीटर जागा मिळते. लहानशा रस्त्यावर संथ असल्यास एकाचवेळी बस आणि रिक्षा मार्गस्थ होऊ शकतात. पण, मेशी फाटय़ावरील वळणावर तसे घडले नाही. भरधाव वेगात वळण घेतांना विरुध्द मार्गिकेत गेलेली बस समोरून येणाऱ्या रिक्षाला धडकली. नंतर रिक्षाला फरफटत नेऊन ती १० मीटरवरील विहिरीत कोसळली. अपघातावेळी बसचे टायर फुटलेले नव्हते. भरधाव वेगामुळे चालकाला ती नियंत्रित करता आली नाही. भरधाव वेग, एसटी चालकाचा निष्काळजीपणा मेशी फाटय़ावरील अपघातास कारक ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष ग्रामीण पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने काढला आहे.

मंगळवारी दुपारी देवळा तालुक्यातील मेशी फाटय़ाजवळ झालेल्या भीषण अपघातात २६ जणांना प्राण गमवावे लागले. समोरासमोर धडक होऊन नंतर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या विचित्र अन् तितक्याच भीषण अपघाताची कारणमींमासा यंत्रणांनी सुरू केली आहे. पोलीस, प्रादेशिक परिवहन (आरटीओ) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. देवळा-मालेगाव रस्ता राज्य मार्ग असला तरी त्याची रूंदी कमी आहे. अशा मार्गावर काळजीपूर्वक वाहन चालविणे गरजेचे असते. बस चालक ते करू शकला नाही. बसचा वेग इतका होता की, जाड भिंतही तिने उद्ध्वस्त केली असती असे हॉटेलचालक, प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले. बसप्रमाणे आकाराने मोठी वाहने वळण घेतांना विरुध्द बाजूच्या मार्गिकेत जातात. आपल्या वाहनाची मागील चाके रस्त्यावरून खाली उतरू नये म्हणून क्षणभर त्यांच्याकडून तसे केले जाते. वेग कमी असल्यास वाहन नियंत्रित करणे शक्य असते. या घटनेत अ‍ॅपे रिक्षा आपल्या मार्गिकेत योग्य पध्दतीने मार्गक्रमण करीत होती. भरधाव वळण घेतांना बस विरुध्द बाजूला शिरली आणि रिक्षाला धडकली. रस्ता आणि विहीर यामध्ये १० मीटरचे अंतर आहे. बस रिक्षाला फरफटत तिथपर्यंत घेऊन गेली आणि विहिरीचा कथडा तोडू शकली. यातून तिचा वेग लक्षात येत असल्याचे घटनास्थळी भेट देणाऱ्या प्रादेशिक परिवहनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विहिरीतून बाहेर काढलेल्या बसचे त्यांनी अवलोकन केले. बसचे सर्व टायर सुस्थितीत असून एकही फुटलेले नाही. बसमध्ये अन्य तांत्रीक दोष नव्हते. २०२१ पर्यंत अपघातग्रस्त बस तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आहे. या सर्वाचे अवलोकन करीत यंत्रणांनी अपघातास बस चालकाचा निष्काळजीपणा मुख्यत्वे कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. एसटी महामंडळाला ते मान्य आहे.  कळवण आगाराचे चालक पी. एस. बच्छाव हे जबाबदार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. अपघातात बच्छाव यांचाही मृत्यू झाला. विहिरीचे कथडे मजबूत नव्हते. अपघातानंतर बस आणि रिक्षा विहिरीत कोसळले नसते तर मृतांची संख्या इतकी वाढली नसती, असे आरटीओचे निरीक्षण आहे.

चालक भरधाव बस चालवत होता. वेगात वळण घेतांना विरुध्द बाजूकडील मार्गिकेत शिरला. समोरून येणाऱ्या रिक्षाला धडकला. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती आणि घटनास्थळावरील स्थिती लक्षात घेता अपघातास बस चालकाचा निष्काळजीपणा, भरधाव वेग कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल होईल. – डॉ. आरती सिंह (पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: High speed bus wrong side accident akp

ताज्या बातम्या