सलग आलेल्या सुटय़ांमुळे शिर्डीत साई दर्शनासाठी भक्तांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली आहे. आज, रविवारी दर्शनाची रांग मंदिरापासून एक ते दीड किमी अंतरापर्यंत गेली होती. शिर्डीतील रस्ते भक्तांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते.
शनिवार, रविवार तसेच स्वांतत्र्य दिनाची सोमवारची सुट्टी यामुळे देशभरातील भाविकांनी धार्मिक पर्यटनाची जोड दिल्याने शिर्डीत शनिवारपासूनच गर्दी वाढण्यास प्रारंभ झाला. ही गर्दी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. आज दुपारच्या आरतीच्या दरम्यान जुन्या प्रसादालयातील भाविकांची रांग वाढत जाऊन पुढे लक्ष्मीनगर पर्यंत गेली होती. तर साई मंदिराच्या पूर्वेकडील १६ गुंठय़ातील दर्शन रांग महालक्ष्मी मंदिरापर्यंत गेली होती. आज दुपापर्यंत ३५ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. प्रसादालयातून देण्यात येणारा प्रसाद देणगीदाराच्या देणगीतून मोफत देण्यात आला. दर्शन रांगेतून दर्शन घेणाऱ्या भाविकांना मोफत बुंदी प्रसाद देण्यात येत आहे. शिर्डीत वाहनतळ नसल्याने अनेक भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली. खाजगी वाहनतळ चालकांनी दरातही मोठय़ा प्रमाणात वाढ केली. गर्दीमुळे शिर्डीतील आíथक उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. गर्दीच्या पाश्र्वभूमीवर संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात येणारे व्हीआयपी पास व्यवस्था चालु ठेवण्यात आली होती. गर्दीचा फायदा घेत चोरटय़ांनी भाविकांची पर्स, पाकिटे, मोबाईल व रोख रकमेवर डल्ला मारला. पोलीसांनी मात्र काही घटनांची दखल घेतली नाही. गुन्ह्यात वाढ होवू नये यासाठी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची टाळाटाळ केली. गर्दीच्या काळात मोठय़ा प्रमाणात चोरांच्या टोळया सक्रिय होतात. या टोळयांचा बंदोबस्त करण्यास पोलीस सातत्याने अपयशी ठरत आहेत.
गर्दीच्या पाश्र्वभूमीवर तसेच साईबाबा संस्थानला आलेल्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. बॉम्बशोधक पथकही विविध ठिकाणची तपासणी करुन सुरक्षेची काळजी घेत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
झाड कोसळून ४ जखमी
सायंकाळी चारच्या सुमारास देवस्थानच्या परिसरात निलगिरीचे झाड कोसळून चार जण जखमी झाले ते परप्रांतीय आहेत. त्यांना साई संस्थानच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge crowd of devotee at shirdi sai temple for darshan
First published on: 15-08-2016 at 04:19 IST