शहरात गंजमाळ परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे १०० झोपडय़ा भस्मसात झाल्या. अतिशय दाटीवाटीच्या वस्तीत आग वेगाने पसरली. चार ते पाच घरातील सिलिंडरचे स्फोट झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अन्य घरांमधून ४० सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. घरांसह संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाल्यामुळे ऐन टाळेबंदीत रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली.
या परिसरात एकमेकांना लागून शेकडो घरे असून अरुंद गल्लीबोळ आहेत. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवितांना अग्निशमन विभागास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. आगीचे कारण समजू शकलेले नाही. सकाळी साडेनऊ वाजता एका झोपडीला आग लागली. काही क्षणांत ती आसपासच्या भागात पसरली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. टाळेबंदीमुळे अनेक मार्गावरील रस्ते लोखंडी जाळ्या लावून बंद करण्यात आले असल्याने अग्निशमन दलाच्या बंबांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. लहान मुले, महिलांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. यावेळी वारा वहात असल्याने आग पसरत होती. बहुतांश घरे पत्रे, लाकडाचा वापर करून तयार केलेली आहेत. सिलिंडरचे स्फोट होऊ लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. शेकडो घरांतील सिलिंडर आगीच्या विळख्यात सापडल्यास अनर्थ घडेल हे लक्षात घेऊन जवानांनी सिलिंडर आधी बाहेर काढण्यास सुरूवात केली. अथक प्रयत्नांती ४० हून अधिक सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन अधिकारी राजेंद्र बैरागी यांनी सांगितले.
चिंचोळ्या गल्लीबोळातून मार्ग काढून आग विझविणे जिकिरीचे ठरले. अग्निशमन दलाने आपल्या सर्व केंद्रांसह एचएएल, महिंद्रा, मऔविम अशा एकूण १८ बंबांची मदत घेतली. बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या. अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत सुमारे १०० झोपडय़ांचे मोठे नुकसान झाले होते. या घरातील बहुतांश साहित्य भस्मसात झाले. या घटनेत जिवितहानी झाली नाही. पण मोठी वित्तहानी झाल्याचे बैरागी यांनी सांगितले. आग विझवितांना अग्निशमनचे जगदीश देशमुख, विजय शिंदे हे किरकोळ जखमी झाले. आगीची झळ जनावरांना देखील बसली.
बेघर झालेल्यांची तात्पुरती व्यवस्था
टाळेबंदीत हाताला काम नसल्याने बहुतांश कामगार, मजूर आपापल्या घरीच आहेत. कामगार, मोजमजुरी करणारे अधिक्याने सहकारनगर भागात वास्तव्यास आहेत. तर, भीमनगर येथील १०० रहिवाशांचे आगीच्या तडाख्यात सर्व काही होत्याचे नव्हते झाले. डोक्यावरील छप्पर नाहिसे झाले. टाळेबंदीत ही कुटुंबे बेघर झाली. डोळ्यांदेखत घर जळताना बघण्याची वेळ त्यांच्यावर आली. महापालिकेने बेघर झालेल्या रहिवाशांची बी. डी. भालेकर आणि महापालिकेच्या आसपासच्या शाळांमध्ये तात्पुरती निवास, भोजनाची व्यवस्था केली आहे.