आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतूने आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र यांच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी होणाऱ्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वाळू कतोरे हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून कृष्णकांत भोजने, डॉ. सुनील पऱ्हाड हे मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी एकलव्य आदिवासी कला प्रबोधन पथक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. आदिवासी साहित्य, आदिम संस्कृती, क्रांतिकारक, आदिवासींचा इतिहास यावर या मेळाव्यात चर्चा होणार आहे. मेळाव्यास नाशिक, नगर जिल्ह्यासह राज्याच्या इतर भागांतूनही आदिवासी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन सांदण ग्रुप परिवार, आदिवासी विचार मंच, आदिवासी एकता परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.