लोकसत्ता वार्ताहर

धुळे: गुंगीकारक आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या औषधांचा साठा केल्याने तीन जणांविरूद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत औषधांसह ९८ हजार ७०० रुपयांची सामग्री जप्त केली आहे.

यासंदर्भात मनिष सोनगीरे यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. शाबीर शहा (४२, रा. ८० फुटी रोड), कलीम शहा (३४, रा. शिवाजी नगर, ८० रोड), सद्दाम हुसेन (३१, रा. ताशा गल्ली, सुलतानिया चौक) हे सर्व धुळ्यातील रहिवासी बुधवारी रात्री औषधी साठ्यासह आढळून आले. मालेगाव रस्त्यावरील खांडल विप्र भवनसमोरील स्नेहनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांना रंगेहात पकडले.

संशयितांनी बेकायदेशीरपणे हा औषधसाठा स्वतःकडे ठेवला होता. कुठलाही वैद्यकीय परवाना नसतांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि डॉक्टरांच्या सूचनेशिवाय ही औषधे बाळगण्यात आली होती. बेकायदेशीर व चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने संशयितांनी हा औषध साठा केला होता, असा पोलिसांना संशय आहे. तीनही संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.