यंदा जास्त पैसे मोजावे लागण्याची चिन्हे

अनिकेत साठे, नाशिक

अवकाळी पावसाने यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादनाचे गणित विस्कटले आहे. जिल्ह्य़ात सुमारे ८० हजार हेक्टरवर बागा असून त्यातून दरवर्षी १४ ते १५ लाख टन द्राक्ष उत्पादित होतात. यंदा हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्य़ांनी कमी होण्याचा अंदाज आहे. मालाची कमी उपलब्धता हे दरवाढीचे कारण ठरेल. बागा वाचविण्यासाठी औषधांची मोठय़ा प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. द्राक्षांच्या दर्जावर प्रतिकूल हवामानाचा परिणाम होणार असल्याने निर्यात घटण्याचा धोका आहे.

दिवाळीत झालेल्या पावसाने ५५ हजार हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. हंगामपूर्व द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली. तर वेगवेगळ्या टप्प्यात असणाऱ्या बागांनाही झळ सहन करावी लागली. केवडा, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने काहींना बागा सोडून द्याव्या लागल्या. या सर्वाचा परिणाम द्राक्ष हंगामावर होणार आहे. द्राक्ष बागाईतदार संघाचे मानद सचिव अरुण मोरे यांनी उत्पादनात ३० टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त केली. जानेवारीअखेपर्यंत ज्या बागांची काढणी होईल, तिथे एकरी अडीच ते तीन टन मालही निघणार नाही. एरवी एकरी सरासरी सात ते आठ टन उत्पादन मिळते. पोषक हवामान असल्यास जिल्ह्य़ात सुमारे १५ लाख टन द्राक्ष उत्पादित होतात. यंदा हे प्रमाण ३० टक्क्य़ांनी कमी होईल. त्यातही जो माल हाती येईल, त्याचा दर्जा कसा असेल, याबाबत साशंकता आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत वातावरणाची साथ मिळालेली नाही. या काळात थंडी वाढते. तापमान १२ अंशाच्या खाली गेल्यास डावणीचा धोका कमी होतो. अद्याप तशी थंडी पडलेली नाही. याचा दर्जा, उत्पादनावर परिणाम होईल, असे मोरे यांनी सांगितले.

या एकंदर स्थितीत निर्यातीसाठी नोंदणी करणाऱ्या उत्पादकांची संख्या घसरली आहे. मागील हंगामात ३५ हजार उत्पादकांनी नोंदणी केली होती. यावर्षी मुदतवाढ देऊनही संख्या १७ हजारांपर्यंत सीमित राहिली. त्यातील किती जणांच्या द्राक्षांची निर्यात होईल, हे सांगणे अवघड आहे. शासकीय मदतीवर उत्पादक समाधानी नाही. आज काही औषधांच्या फवारणीसाठीही पैसे नाहीत. पुढील वर्षी बागा कशा तयार करायच्या, हा प्रश्न आहे. सरकारकडून जी मदत जाहीर झाली, ती तुटपुंजी आहे. फवारणीच्या तीन-चार औषधांचीच तेवढी किंमत होते. व्यवसाय परवडला नाही तर वेगळा विचार करावा लागतो. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सुमारे ५०० एकरवरील द्राक्षबागा तोडून टाकल्याचे बागाईतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी नमूद केले. उत्पादनात घट होणार असल्याने ग्राहकांना द्राक्षांसाठी जादा किंमत मोजावी लागणार आहे.

नैसर्गिक आपत्तीने पूर्वहंगामी द्राक्षांचे नुकसान झाले होते. त्या काळात वेगवेगळ्या टप्प्यात असणाऱ्या उर्वरित बागांनाही झळ बसली. याचा द्राक्षांच्या दर्जावर परिणाम होणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्य़ातून विक्रमी म्हणजे एक लाख ४० हजार टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा तितकी निर्यात होणार नाही. द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणीची मुदत ३० डिसेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे.

– संजीव पडवळ (कृषी अधिकारी)

हंगामाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे जानेवारीच्या उत्पादनात ५० टक्के, फेब्रुवारी-मार्चमध्ये १० ते १५ टक्के घट होणार आहे. गेल्या वर्षी प्रारंभी उत्पादकांना प्रति किलोस ६० ते ७० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. आवक वाढल्यानंतर भाव सरासरी ५० आणि ४५ रुपयांपर्यंत खाली आले होते. उत्पादन कमी असल्याने यंदा प्रारंभीच ३० ते ४० टक्के दर वाढू शकतील. सप्टेंबपर्यंत द्राक्ष बागा छाटणी करणाऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. या सर्वाचा परिणाम निर्यातीवर होईल.

– विलास शिंदे (प्रमुख, सह्य़ाद्री फाम्र्स)