जळगाव : सातपुडा पर्वतरांगांमध्ये राहणार्‍या आदिवासी बांधवांच्या होळीपूर्वी आदिवासी भागांत भोंगर्‍या बाजाराला सुरुवात होते. वर्षभर आदिवासी बांधव कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले असतात. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांसह पाड्या-वस्त्यांत होळी सणाचा अविभाज्य घटक असणारा भोंगर्‍या बाजार उत्साहात भरविण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये चोपडा तालुक्यातील अडावद, वैजापूर-गेरूघाटी, उनपदेव, जामुनझिरा यांसह इतर आदिवासी गावांत, वाड्या-वस्त्यांत होळीपूर्वी आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा भोंगर्‍या बाजार हर्षोल्सात आणि चैतन्यमयी वातावरणात झाला. भोगरा बाजार होळीपूर्वी दहा दिवसांपासून सुरू होतो. सातपुडा पायथ्याशी असलेल्या गावांत वारनुसार भोंगर्‍या बाजार भरविला जातो. होळीपूर्वी २३ मार्च रोजी वैजापूर या आदिवासी गावात भोंगर्‍या बाजार भरविण्यात आला. भोंगर्‍यानिमित्त आदिवासी गावे-पाडे-वस्त्यांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगतच्या गावांसह पाड्या-वस्त्यांतील हजारो आदिवासी सहकुटुंब आले होते. सकाळपासूनच भोंगर्‍या बाजारात आदिवासी बांधवांची रेलचेल सुरू झाली होती.

uran marathi news, gaon dev yatra
उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू
22 high tide days during monsoon
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध

हेही वाचा : जळगाव मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार कोण ?

आदिवासींचे विविध रंगांतील आणि ढंगांतील पेहराव, तसेच ढोल-ताशांच्या गजरातील सामूहिक नृत्य, त्यातील विविधता भोंगर्‍या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरले. तरुणांमधील सळसळता उत्साह व आदिवासी संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन या भोंगर्‍या बाजारातून घडले. त्या- त्या पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी भोंगर्‍या बाजारात हजेरी लावली. सकाळपासून आदिवासी युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते. आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून, तर काही मिळेल त्या वाहनातून बाजाराला आले होते. दुपारी बारापासून विविध आदिवासी बांधव आपापल्या गटाने नृत्य, नाचगाणे आदींच्या कलाविष्कारात सायंकाळपर्यंत दंग झाले होते. मध्यभागी मोठा ढोल व ताट वाजवीत बासरी आणि त्याभोवती युवक-युवतींसह आबालवृद्ध गोलरिंगण करून नाचत होते. तरुण-तरुणींनी खास आदिवासी पोशाख, काहींनी कमरेभोवती शाल गुंडाळल्या होत्या. पारंपरिक आदिवासी गीतांसह काही हिंदी चित्रपटांच्या गीतांचीही धूनही आपल्या बासरीतून वाजवीत होते. यावेळी बासरी वादन, घुंगरू आदी कलाविष्कारातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले.

हेही वाचा : अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा

सातपुड्यातील आणि अन्य ठिकाणी तसेच मध्य प्रदेशातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षभर काबाडकष्ट करणारे आदिवासी बांधव सर्व देहभान विसरून भोंगर्‍यात बेधुंदपणे नाचगाणे करून आपल्या संस्कृतीचे एकप्रकारे जतन करून काही काळ का असेना दुःख आणि दारिद्र्य विसरून भोंगर्‍याचा आनंद लुटला. भोंगर्‍यानिमित्त बाजारात पाळणे, झुले आले होते. त्याचा आदिवासी बालगोपाळांसह तरुण-तरुणींनी आनंद घेतला. भोंगर्‍या बाजारात आदिवासी बांधवांनी भोंगर्‍या विशेष गुळाची जिलेबी, गोडशेव, पानठेल्यावरील कलकत्ता मिठा पान, कुल्फी, शीतपेय आदी पदार्थांसह हातावर गोंधून घेणे, छायाचित्र काढणे, बेंटेक्सचे दागिने, साड्या-पातळ आदींसह जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आदिवासी महिला व तरुणींना वस्त्रालंकार, तसेच गृहोपयोगी वस्तीूंच्या खरेदीसाठी गर्दी केली. भोंगर्‍या बाजारात लाखोंची उलाढाल झाली. सायंकाळी उशिरापर्यंत भोंगर्‍या बाजारातील आदिवासी शैलीतील खास ढोल व बासरीचे सूर निनादत होते. सायंकाळी उशिरापर्यंत बाजारात हा उत्साह टिकून होता. सायंकाळी सातनंतर आलेले हजारो आदिवासी एकमेकांना गुलाल लावून, गूळ, फुटाणे, हार, कंगणच्या प्रसादाची देवाणघेवाण करून एकमेकांची गळाभेट घेत आपापल्या पाड्या-वस्त्यांकडे मार्गस्थ झाले.