नंदुरबार : संकटामध्ये सापडलेले तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मागील महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिमांडळ या ठिकाणी शनिदेवाच्या चरणी लीन झाले होते. कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार अशी चर्चा सुरु असताना त्यांना कृषिमंत्रीपदाऐवजी क्रीडामंत्री करण्यात आले. म्हणजेच त्यांचे मंत्रीपद वाचले.

या पार्श्वभूमीवर, नंदुरबारचे पालकमंत्री असलेले माणिक कोकाटे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी नंदुरबार येथे उपस्थित झाल्यावर त्यांनी श्री क्षेत्र शनिमांडळ येथील शनी मंदिरात जाऊन पूजा केली. परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालू शकत नाही, असे यावेळी कोकाटे म्हणाले. शनीदेव आपल्यामागे खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनेक दिवसापासून सुरू असलेली विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून मुक्ती मिळावी म्हणून मंत्री कोकाटे यांनी मागील महिन्यात शनिमांडळ येथील मंदिरात दर्शन घेतल्याचे म्हटले जात होते. शनी मंदिरात जाऊन शनि देवाची विधिवत पूजा त्यांनी केली होती. शनि देवाची पूजा केल्याने मागे लागलेली इडा पिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे.

शेतकऱ्याबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्ये, विधिमंडळातील रमी प्रकरण, यामुळे कोकाटे यांच्याविरुध्द वादंग उठले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे कोकाटे यांचा राजीनामा घेतील असे म्हटले जात होते. त्या पार्श्वभूमीवर, कृषिमंत्री असताना कोकाटे यांनी श्री क्षेत्र शनिमांडळ गाठत शनिदेवाला साकडे घातले होते. शनी मंदिरात पूजा केली होती.

नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिरात याआधीही अनेक राजकीय नेत्यांनी दर्शन घेतले आहे. संकटात सापडलेले अनेक राजकीय नेते या ठिकाणी भेट देत असतात. मंत्रीपद टिकल्यानंतर माणिक कोकाटे यांना दिलासा मिळाला. कोकाटे हे नंदुरबारचे पालकमंत्री असल्याने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजवंदनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यानिमित्त शुक्रवारी नंदुरबार दौऱ्यावर आले असता क्रीडामंत्री कोकाटे हे श्री क्षेत्र शनिमांडळ येथे शनी मंदिरात दर्शनासाठी गेले. मंदिरात ते काही वेळ थांबलेही.

मंदिरातून बाहेर पडताना प्रसन्न दिसणाऱ्या कोकाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शनीदेवाची आपल्यावर कृपा आहे. परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालू शकत नाही. शनी माझ्यामागे लागला म्हणून याआधी काही घडामोडी घडल्या, असे म्हणण्यापेक्षा शनीदेव माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे कोकाटे यांनी सांगितले.

मागील महिन्यात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उपस्थित राहण्यासाठी आलो होतो. त्यावेळी जवळच शनिमंदीर असल्याने दर्शन न घेता परत जाणे योग्य वाटले नाही. त्यामुळे आपण दर्शन घेऊन पूजा केली होती, असे माणिक कोकाटे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.