सरबराईला न भुलता विधिमंडळ अंदाज समितीची पाहणी

नाशिक : शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी दाखल झालेल्या विधिमंडळ अंदाज समितीच्या सरबराईत प्रशासकीय यंत्रणेने कुठलीही कमतरता भासणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. दुसरीकडे समितीने सरबराईला न भुलता विविध मुद्यांवरून यंत्रणेला फैलावर घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेवरून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची कानउघाडणी केली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दीड महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आलेली ही तिसरी समिती. पूर्वानुभवामुळे प्रशासकीय यंत्रणेने समित्यांची बडदास्त राखण्याचे कौशल्य बहुदा आत्मसात केले आहे. त्याचे प्रत्यंतर तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीच्या पहिल्याच दिवशी पाहण्यास मिळाले. या समितीत एकूण ३१ सदस्य आहेत. तथापि, अध्यक्ष रणजित कांबळे यांच्यासह विनायक मेटे, प्रकाश सोळंके, कृष्णा खोपडे, अमित झनक, निलय नाईक असे एकूण २०  सदस्य या दौऱ्यावर आले. उर्वरित ११ सदस्यांच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

विश्रामगृहात समितीच्या स्वागताला अधिकाऱ्यांचा इतका लवाजमा जमला की, हा परिसर वाहनांनी अक्षरश भरून गेला. पाय ठेवायला देखील जागा नव्हती. समितीच्या भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केली गेली. पदार्थ निवडतांना सणोत्सवाचा विसर पडला. समितीची बडदास्त राखणे, हे एकमेव ध्येय यंत्रणेने ठेवल्याचे दिसले. प्रारंभी, अंदाज समितीने सर्व विभागांच्या प्रमुखांसमवेत एकत्रित बैठक घेतली. नंतर विभागनिहाय कामे, योजनांचा स्वतंत्र बैठकीद्वारे आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामावरून समितीने जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढल्याचे सांगितले जाते. बराच वेळ बैठकांचे सत्र सुरू होते.

सायंकाळी समितीच्या वाहनांचा ताफा उर्दू शाळेलगतच्या जिल्हा दुय्यम निबंधकांच्या कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. सहकार विभागाशी निगडीत योजनांचा आढावा सायंकाळी उशिरापर्यंत घेतला जात होता. क्षेत्रीय भेटी अंतर्गत सायंकाळी स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांची पाहणीचे नियोजन आहे. मुळात स्मार्ट सिटी कंपनीची अनेक कामे आधीपासून वादाच्या भोवऱ्यात आहेत. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अनेक कामे रेंगाळली आहेत. काही सुरूच झालेली नाही. खोदकामाने व्यापारी, नागरिक त्रस्त आहेत. या स्थितीत अंदाज समिती स्मार्ट योजनेतील कामांचा आढावा कशाप्रकारे घेते, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

समितीच्या दौऱ्यापासून प्रसारमाध्यमांना दूर ठेवले गेले. विभागनिहाय बैठका बंद दाराआड  झाल्या. अंदाज समितीचा दौरा यशस्वीपणे पार पडावा, यासाठी खास अधिकारी व तहसीलदारांची नियुक्ती केली गेली आहे. पहिल्याच दिवशी समितीचा अंदाज घेऊन यंत्रणा आवश्यक ते बदल करण्याच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे.

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration zilla parishad construction department ssh
First published on: 16-09-2021 at 01:39 IST