नाशिक : कठोर टाळेबंदीतून औषध, प्राणवायू निर्मितीशी संबंधित उद्योगांना वगळण्यात आले आहे. अन्य उद्योगांना कामगारांची कारखान्यात वा लगत निवास-भोजन व्यवस्था, प्रतिजन चाचणी अशा अटी-शर्ती असल्याने औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आधिक्याने बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर जिल्ह्यात कठोर टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून औषध, प्राणवायू निर्मिती उद्योगांना सवलत मिळाली. कमी मनुष्यबळात आस्थापना सुरू ठेवण्यास त्यांना परवानगी आहे. अन्य उद्योगांना सक्तीने १० दिवसांची विश्रांती घ्यावी लागण्याची अधिक शक्यता आहे. कारण, या काळात घराबाहेर पडण्यास निर्बंध आहेत. जे उद्योग कामगारांची कारखान्यात किं वा लगतच्या ठिकाणी निवास, भोजनाची व्यवस्था करतील, केवळ त्यांना आपले उद्योग सुरू ठेवण्यास मुभा आहे. तसेच या मनुष्यबळाची दर १० दिवसांनी जलद प्रतिजन चाचणी करण्याचे बंधन आहे. या सूचनांचे पालन न करणारे उद्योग बंद राहतील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेशात म्हटले आहे. सर्व प्रकारची बांधकामे प्रकल्पस्थळी कामगारांची व्यवस्था करून कमी मनुष्यबळात सुरू ठेवता येतील. अशी व्यवस्था करू शकणाऱ्यांना उद्योग, बांधकाम सुरू ठेवता येणार आहे.

भाजीपाला पुरवठा कसा होणार?

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या या काळात बंद राहणार आहेत. एकट्या नाशिक बाजार समितीतून दररोज मुंबईला १०० ते १५० वाहने भाजीपाला घेऊन जातात. बाजार समिती बंद राहणार असल्याने या काळात उत्पादित होणारा भाजीपाला कोण, कसा कुठे खरेदी करणार, तो पुढे कु ठे पाठवला जाणार असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. कांदा व अन्य कृषिमालाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करण्याची जबाबदारी बाजार समित्यांवर टाकण्यात आली. या निर्णयामुळे शहरी भागात भाजीपाला वा तत्सम पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आठवडे बाजार बंद असतील. रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर आखणी करून भाजी, फळ विक्री करण्याची व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांना करावी लागणार आहे. फिरत्या हातगाडीवरून भाजीपाला विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. शहराच्या आसपास असणारे शेतकरी शहरात विक्री करू शकतील. परंतु, अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांची नाशवंत मालाची विक्री करताना दमछाक होईल. बाजार समितीत व्यापाऱ्यांना एकत्रित स्वरूपात माल खरेदी करता येतो. ग्रामीण भागात फिरून ते कितपत माल खरेदी करतील हा प्रश्न आहे. बाजार समिती मालाच्या विक्रीची नेमकी काय व्यवस्था करतात यावर बरेच काही अवलंबून आहे.

हॉटेल, मद्यविक्री ‘पार्सल’द्वारे

हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मद्यविक्रीची दुकाने घरपोच पार्सल सेवा देण्यासाठी सकाळी सात ते दुपारी १२ आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत सुरू राहतील. कोणत्याही परिस्थितीत या आस्थापनांमध्ये ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शिवभोजन थाळी केंद्र सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहील. त्यांना अन्नपदार्थ केवळ पार्सलद्वारे वितरित करता येईल.