साहित्य संमेलनाला गालबोट, गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं भ्याड कृत्य!

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलनामध्ये शाईफेक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Girish Kuber
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर

नाशिक येथील साहित्य संमेलनाला आज तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गालबोट लागलं. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलन स्थळी शाई फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजी ब्रिगेडनं ही शाईफेक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून ते दोघेही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अशा प्रकारे शाईफेक करून भ्याड हल्ला करणं निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटू लागली आहे.

शेवटच्या दिवशी साहित्य संमेलनाला गालबोट

साहित्य संमेलनाचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. मात्र, शेवटच्या दिवशी साहित्य संमेलनाला गालबोट लागलं आहे. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही गिरीश कुबेर यांच्यावर हा भ्याड शाईहल्ला करण्यात आला आहे. संमेलन स्थळी गिरीश कुबेर दाखल होत असताना हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे शेवटच्या दिवशी संमेलनाला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने गिरीश कुबेर यांना सुरक्षितपणे सभागृहात पोहोचवलं. हा भ्याड हल्ला करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सतीश काळे आणि राजेश बुंदला अशी या दोघांची नावं असल्याची माहिती खुद्द संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

शिवसेनेनं केला शाईफेकीचा निषेध

दरम्यान, या प्रकाराचा शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध करतो. गिरीश कुबेर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, लोकसत्तासारख्या दैनिकाचे संपादक आहेत. त्यांनी जे काही लिखाण केलं असेल किंवा करत आहेत त्यावर मतभेद असू शकतात. पण मुळात त्यांनी काय लिहिलंय, हे किती लोकांनी वाचलंय? न वाचता अशा पद्धतीने मराठी साहित्य संमेलन सुरू असताना त्यांच्यावर अशा प्रकारे शाईफेक करणं हे कुणालाही मान्य होणार नाही. त्यांनी जे काही लिहिलं आहे, त्यासंदर्भात काही लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत खरं-खोटं होईलच. पण साहित्य संमेलन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ असतं. तिथे एका संघटनेचे काही लोक येतात आणि त्यांच्यावर शाई फेकतात, धक्काबुक्की करतात. वीर सावरकरांच्या भूमीत, कुसुमाग्रजांच्या भूमीत असं करून संभाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील त्यांनी डागाळलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनेसान्स – दी अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्रा या पुस्तकातील काही भागावर आक्षेप असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडकडून घेण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे.

समाज जर एका दिशेला जात असेल तर माध्यमांनी दुसरी दिशा दाखवली पाहिजे : गिरीश कुबेर

दरम्यान, या प्रकारानंतर गिरीश कुबेर परिसंवादाच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी मंचावरून भाषण करताना माध्यमांच्या भूमिकेविषयी सविस्तर म्हणणं मांडलं. गिरीश कुबेर म्हणाले, “माध्यमं हा समाजाचा एक घटक असतो, त्यामुळे माध्यमांचं मनोरंजीकरण झालं म्हणजे समाजाचं मनोरंजीकरण झालंय. समाजात वैचारिकतेचा अभाव असेल तर तो माध्यमांमध्येही तसाच दिसेल. त्याचवेळी माध्यमांची खरी जबाबदारी असते ती अशा समाजाला वैचारिकतेकडे नेणं. माध्यमांमध्ये का यायचं याबाबत माझे संपादक गोविंद तळवलकर यांनी भूमिका सांगून ठेवली होती. तसं करण्याचीच माझी आस होती. समाज जर एका दिशेला जात असेल तर माध्यमांनी मध्ये उभं राहून दुसरी दिशा दाखवली पाहिजे. आता उलटं झालं आहे. समाज एका दिशेने जात असेल तर माध्यमं देखील त्याच दिशेने जातात. माध्यमं आधी पुढे पळतात की समाज पुढे पळतो अशा प्रकारचं सध्या चित्र आहे. हा माध्यमांचा खऱ्या अर्थाने पराभव आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ink thrown on girish kuber at sahitya sammelan nashik pmw