विविध सामाजिक उपक्रमांतून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे कॅनडास्थित डॉ. जगन्नाथ काशिनाथ वाणी (८३, मूळ गाव धुळे) यांचे भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कॅलगरी (कॅनडा) येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच भाऊ, आई, बहीण, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. वाणी यांच्या कार्याचा गौरव कॅनडा सरकारने ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने केला होता.

कॅनडा येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डॉ. वाणी यांनी धुळ्यात शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उच्चशिक्षण पुण्यात, तर विद्या वाचस्पती पदवी कॅनडात जाऊन मिळवली. उच्च शिक्षणानंतर त्यांना कॅनडात सांख्यिकी आणि विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून संधी मिळाली. डॉ. वाणी यांनी धुळ्यात का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था स्थापन करून या क्षेत्रात भरीव योगदान दिले. मनोरुग्ण व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडा व देशात अनेक उपक्रम राबविले. स्किझोफ्रेनिया सोसायटीची पुण्यात स्थापना करत या आजाराच्या रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. ‘देवराई’ आणि ‘एक कप चा’ असे काही चित्रपट व लघुपटांची निर्मिती, शारदा नेत्रालयाद्वारे हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळा, गरीब विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व चष्म्यांचे मोफत वाटप, विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार, गरजू रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया अशा विविध कार्यात डॉ. वाणी यांचा अखेपर्यंत मोलाचा सहभाग राहिला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विमाशास्त्रीय विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी चालना दिली. कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी आणि महाराष्ट्र मंडळाची त्यांनी स्थापना केली. डॉ. वाणी हे राष्ट्र सेवा दलाचे सैनिक होते. परदेशात स्थायिक असूनही मायदेशाकडे अर्थात धुळ्याकडे नेहमी लक्ष असायचे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था ही त्याची पावती आहे. धुळ्याचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चंद्रकांत केले, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी व पतसंस्था फेडरेशनचे राज्य संचालक गोपाळराव केले यांचे ते बंधू होत.