जळगाव – सोन्याची शुद्धता, व्यवहारातील पारदर्शकतेमुळे संपूर्ण देशात नावाजलेली आणि जळगावला वेगळी ओळख मिळवून देणारी सुवर्ण बाजारपेठ आता कात टाकणार आहे. जळगावला जागतिक दर्जाचे सुवर्ण केंद्र (ग्लोबल गोल्ड हब) बनविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेतला असून, सुवर्ण व्यावसायिकांना प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. .
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सद्यःस्थिती दीडशे पेक्षा जास्त पेढ्या आणि जिल्हाभरात पाचशेवर सुवर्ण दालने कार्यरत आहेत. त्यातील मोठ्या सुवर्ण पेढ्या वैविध्यपूर्ण नक्षीचे दागिने आपल्या दिमतीला असलेल्या कुशल कारागिरांकडून तयार करून घेत असले, तरी लहान पेढ्या मजुरीने दागिने घडवणाऱ्या कारागिरांवरच अवलंबून असतात. या कारणाने जळगाव शहरात सुवर्ण अलंकार घडवणारे पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यातील असंख्य कुशल कारागीर स्थायिक झाले आहेत.
पूर्वी पारंपरिक सुवर्ण पेढ्यांमधून सोने विक्री केली जात असे. मात्र, ते चित्र आता पालटले आहे. नाविन्याची जोड देत काही सुवर्ण व्यावसायिकांनी अनेक मजली दालने तयार केली आहेत. या पुढे जाऊन सुवर्ण व्यवसायाला नवी भरारी घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने जळगावला आता जागतिक दर्जाचे सुवर्ण केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकांच्या एका बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. त्यात महाराष्ट्राला नवीन उंचीवर पोहोचवण्यासाठी जळगावची अर्थव्यवस्था आगामी काळात २५ अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याकरीता नव्या शक्यतांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान संकुलाप्रमाणे (आयटी पार्क) जळगावला जागतिक दर्जाचे सुवर्ण केंद्र बनवण्यासाठी एक विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. सुवर्ण तारा विक्रेत्यांसह इतर सर्वांसाठी सामायिक भट्टी, बँकांचे लॉकर, सुरक्षित साठवण सुविधा, अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह सह कार्यकारी क्षेत्र तसेच भाडे तत्त्वावर जागांची उपलब्धता, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि डिझाइन मार्केट, या मुद्द्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, सुवर्ण व्यावसायिकांनी वाढते वीज दर, सुरक्षा व्यवस्था आणि कर प्रणाली, या बाबतच्या अडचणी मांडल्या.
याशिवाय, कौशल्य विकास तसेच विद्यार्थी-शिकाऊ कार्यक्रम सुरू करण्यासह जळगावमध्ये तयार होणाऱ्या सोन्याच्या दागिन्याला भौगोलिक मानांकन मिळविण्याचा प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात शक्यता पडताळून पाहण्यात आली. ज्यासाठी जळगावच्या सोन्यातील खास वैशिष्ट्य ओळखण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी सुवर्ण व्यावसायिकांसह कारागिरांना केले. सुवर्ण केंद्र संकल्पनेला परिपूर्ण स्वरूप देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो सादर करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. बैठकीला जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक सुवर्ण व्यावसायिक उपस्थित होते.
जळगावला जागतिक दर्जाचे सुवर्ण केंद्र बनविण्यासाठी व्यावसायिकांना वीज दर सवलतीसह सुलभ कर प्रणाली, आधुनिक तंत्रज्ञान, जीआय मानांकनाचा लाभ मिळवून देण्याचा विचार आहे. त्यासाठी एक विशेष आर्थिक क्षेत्र विकसित केले जाणार असून, प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. -आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)