सर्वपक्षीय घंटानादास
जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय
नाशिकच्या धरणातील पाणी मराठवाडय़ास देण्याच्या निर्णयास भाजपला जबाबदार धरत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जागे करण्याकरिता संबंधितांच्या निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन केले. भाजपचे आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप घरी नसल्याने आंदोलकांशी त्यांचा सामना झाला नाही; परंतु आ. सीमा हिरे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांची त्यांच्याशी भेट झाली. या प्रश्नावर आपणही नाशिककरांच्या सोबत असून हा विषय सर्वपक्षीयांमार्फत मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी आ. हिरे यांनी दर्शविली. त्यामुळे जवळपास दोन तास वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंदोलनाची सांगता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अखेरीस भाजप आमदाराच्या निवासस्थानी चहापानाद्वारे केली. दरम्यान, या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निकालास स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आल्यामुळे आंदोलकांना धक्का बसला आहे.
मराठवाडय़ातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन जायकवाडी धरणात गंगापूर धरण समूहातून १.३६ तर दारणा धरण समूहातून ३.२४ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने त्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर रविवारी रात्रीपासून गंगापूर, दारणा, मुकणे व कडवा धरणांतून पाणी सोडण्यात आले. तथापि, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांनी गंगापूर धरणावर धडक मारून विसर्ग थांबविण्यास भाग पाडले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुन्हा गंगापूरमधून पाणी सोडण्यात आल्यावर सर्वपक्षीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाशिकमधील धरणांचा विसर्ग न थांबविल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी भाजप आमदारांच्या घरासमोर घंटानाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिवसेनेचे आ. अनिल कदम, महापौर अशोक मुर्तडक, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, सुनीता निमसे आदी पदाधिकारी मंगळवारी सकाळी भाजपचे आ. बाळासाहेब सानप यांच्या घराजवळ पोहोचले. या ठिकाणी त्यांनी घंटानाद व जोरदार घोषणाबाजी करूनही प्रतिसाद मिळाला नाही. आ. सानप घरी नसल्याचे लक्षात आल्यावर आंदोलकांनी आपला मोर्चा गंगापूर रस्त्यावरील आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानाकडे वळविला. या ठिकाणी त्याच पद्धतीने घंटानाद करण्यात आला. आ. फरांदे परदेशात असल्याने त्याही आंदोलकांना भेटू शकल्या नाहीत. त्यानंतर आंदोलक थेट भाजपच्या आ. सीमा हिरे यांच्या सावरकर नगरमधील निवासस्थानावर धडकले. या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू असताना आ. हिरे यांनी घराबाहेर येऊन सर्वाचे म्हणणे जाणून घेतले. नाशिकचे पाणी इतरत्र नेले जाऊ नये या सर्वपक्षीयांच्या मागणीला आपले समर्थन आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असताना न्यायालयात चुकीची माहिती मांडली गेल्याने आज ही स्थिती ओढावली. या संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळामार्फत मुख्यमंत्र्यांसमोर नाशिकची बाजू मांडण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली. आ. हिरे यांच्या भूमिकेमुळे आंदोलनाचा सूर बदलला. आंदोलन आटोपते घेत सर्वपक्षीयांनी आ. हिरे यांच्या घरी चहापान केले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळ नाशिकची बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचिका फेटाळली
नाशिकमध्ये आधीपासून दुष्काळी स्थिती असताना मराठवाडय़ास पाणी देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने त्यास स्थगिती द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका मंगळवारी न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे मराठवाडय़ासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे. औरंगाबादला पिण्यासाठी आवश्यक ठरणारे पाणी सध्या जायकवाडीमध्ये उपलब्ध आहे. असे असताना नाशिकमधून पाणी सोडण्यावर आक्षेप घेण्यात आला. तथापि, नाशिक व नगरमधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी होत आहे यावर राज्याच्या मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सूचित केले. या विषयाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात दाखल असणाऱ्या याचिकांची सुनावणी तातडीने घेण्यास सूचित केले आहे. उच्च न्यायालयात १७ डिसेंबरला होणारी ही सुनावणी आता १८ नोव्हेंरबरला होणार आहे. या बाबतची माहिती जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली.