महामार्ग बस स्थानक, जिल्हा शासकीय रुग्णालय, निमाणी बस स्थानकांवरून सोय

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेल शहराबाहेर भरविण्याचे नक्की झाल्यावर इतक्या दूर साहित्यप्रेमी येणार नाहीत, अशी चर्चा सुरु झाली होती. ही चर्चा किती निर्थक होती, याचे उत्तर तीनही दिवस संमेलनस्थळी ओसंडून वाहणाऱ्या गर्दीने दिले. संमेलनाच्या समारोप सोहळय़ाने गर्दीचा उच्चांक मोडला. संमेलन आयोजकांनी शहराच्या विविध भागातून संमेलन स्थळापर्यंत मोफत बससेवेची सोय उपलब्ध करून दिली होती. त्याचाही गर्दी वाढण्यास हातभार लागला. संमेलनाच्या तीन दिवसात २० हजारांहून अधिक नाशिककरांनी या सेवेचा संलाभ घेतला.

गोखले शैक्षणिक संस्थेच्या आवारात संमेलन होणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र नंतर शहरापासून बारा किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या भुजबळ नॉलेज सिटीच्या संकुलात ते घेण्याचे नक्की करण्यात आले. इतक्या दूरच्या ठिकाणी गर्दी जमविण्याचे आव्हान आयोजकांसमोर होते. संमेलनस्थळापर्यंत साहित्यप्रेमींना सहज येता यावे, यासाठी ‘हात दाखवा बस थांबवा’ ही योजनेअंतर्गत मोफत बस सेवेची सोय करण्यात आली.   शहर परिसरातील शैक्षणिक संस्थांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले.  या आवाहनास प्रतिसाद देत भुजबळ नॉलेज सिटी, क. का. वाघ शैक्षणिक संस्था, जव्हार शैक्षणिक संस्था यांच्यातर्फे २४ तर महापालिकेच्या सिटी लिंक सेवेच्या ४२ बस साहित्यप्रेमींच्या दिमतीला ठेवण्यात आल्या होत्या.

शहरातील महामार्ग बस स्थानक, जिल्हा शासकीय

रुग्णालय तसेच निमाणी बस स्थानकांवरून थेट संमेलनस्थळी जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. अशीच व्यवस्था संमेलनस्थळावरूनही परतीसाठी करण्यात आली. अगदी थेट नाशिकरोड, पाथर्डी, सातपूर अशा दूरच्या ठिकाणापर्यंतही बससेवेचा लाभ देण्यात आला.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी पावसाचे वातावरण असल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. अनेक थांब्यावरून केवळ दोन ते तीन प्रवाशांना घेऊन बस जात होत्या. शनिवार आणि रविवारी पुस्तक खरेदीसह संमेलनस्थळी भेट देण्यासाठी नाशिककरांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली.

महामार्ग, जिल्हा शासकीय रुग्णालय, निमाणी येथून थेट संमेलनस्थळासाठी बससेवा होती. अन्य ठिकाणाहून या तीन ठिकाणी प्रवासी सोडले जात होते. एका बसमधून ५० प्रवाशांची ये-जा करण्यात आली. थांब्यांवरून सकाळी सात ते रात्री १२ नंतरही बससेवा सुरू राहिली. दिवसाला एका बसच्या १० पेक्षा अधिक फेऱ्या झाल्या. संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रतिसाद कमी असला तरी शनिवार आणि रविवारी २० हजाराहून अधिक प्रवाश्यांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे साहित्य संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या परिवहन समितीचे मंदार देशमुख यांनी सांगितले.