नांदेड पोलीस आज घेणार ताब्यात
भ्रामक योजनांद्वारे गुंतवणुकदारांना कोटय़वधी रुपयांना गंडा घालणारा केबीसी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याने भाऊसाहेबविरुध्द नांदेड येथेही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे भाऊसाहेब व त्याची पत्नी आरतीला नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या स्वाधीन करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले. शनिवारी चव्हाण दाम्पत्याला नांदेड पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
केबीसी कंपनीची स्थापना करून भाऊसाहेबने दलालांच्या मदतीने हजारो गुंतवणूकदारांचे पैसे फसव्या योजनांमध्ये आणले. दोन वर्ष परदेशात फरार असलेल्या भाऊसाहेब व त्याची पत्नीला मुंबई विमानतळावर अटक झाल्यानंतर येथील न्यायालयाने टप्प्या टप्प्यांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या काळात तपास यंत्रणेने त्यांच्या मालमत्तेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तब्बल १८ किलो सोने, अडीच किलो चांदी असा सुमारे सहा कोटींचे दागिने जप्त करण्यात आले. पाच किलो सोन्यावर तर भाऊसाहेबने एका बँकेतून कर्जही काढल्याचे निष्पन्न झाले.
चव्हाण दाम्पत्याची पोलीस कोठडीची मुदत संपण्याकडे राज्यातील पोलिसांचे लक्ष होते. कारण, संबंधितांवर वेगवेगळ्या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस कोठडीची मुदत संपण्याआधीच नांदेड व पुणे पोलिसांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले. न्यायालयाने चव्हाण दाम्पत्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नांदेड पोलिसांनी अर्ज करून त्यांना ताब्यात देण्याची विनंती केली. कारागृहातील प्रक्रियेस विलंब होणार असल्याने तुर्तास चव्हाण दाम्पत्याची नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली. शनिवारी सकाळी संबंधितांना नांदेड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc scam accused bhausaheb chavan wife sent to police custody
First published on: 21-05-2016 at 00:06 IST