इगतपुरी : तालुक्यातील नांदगाव सदो शिवाराच्या जंगल परिसरातील एका पडक्या झोपडीच्या पडवीत बिबटय़ाचे १५ दिवसांचे चार बछडे आढळून आली.  जंगल परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसापासून बचावासाठी मादी बिबटय़ाने आपली पिले या झोपडीत आणून ठेवली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या झोपडीकडे नागरिकांनी जाऊ नये, यासाठी वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

नांदगाव सदो शिवाराच्या जंगल परिसरात निर्जनस्थळी शेतात झोपडीवजा पडवी आहे. या ठिकाणी सध्या कोणीही राहत नाही. एका बिबटय़ा मादीने आपले चार बछडे या झोपडीत सुरक्षितस्थळी आणून ठेवले. या संदर्भातील माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन बिबटय़ाची बछडे सुरक्षित असल्याची खात्री केली.

बछडय़ांसाठी बिबटय़ा पुन्हा या ठिकाणी येऊन आपल्या पिलांना दुसऱ्या सुरक्षित स्थळी घेऊन जाईल, असा वनविभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या ठिकाणी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनअधिकारी पी. के. डांगे, भाऊसाहेब राव, वनरक्षक धाडवड आदींचे या ठिकाणी पहारा देत आहेत. आठ ते १५ दिवसांपूर्वी जन्मलेले हे बछडे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.