जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना, भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीकडून (अजित पवार) अजुनही युतीचे संकेत मिळालेले नाहीत. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची शिंदे गटासह अजित पवार गटासोबत जाण्याची तयारी असल्याचे मोठे वक्तव्य एका नेत्याने केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा जळगाव जिल्हा संपर्क दौरा रविवारी पार पडला. त्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा आणि शहराचा आढावा त्यांनी घेतला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. या दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाची महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी नैसर्गिक आघाडी होईल. मात्र, महाविकास आघाडी नैसर्गिक आघाडीसोबतच अन्य कोणतेही पक्ष सोबत आल्यास त्यांच्या समवेत आघाडी करण्यात येईल. पक्ष श्रेष्ठींकडून भाजप सोडून अन्य कोणत्याही राजकीय पक्षांशी युती करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. समविचारी पक्षांना विश्वासात घेऊन शिंदे गटासह अजित पवार गटाशी देखील युती करण्याची आमची तयारी असेल, असे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशाची लोकशाही वाचविण्यासाठी पैशांच्या जोरावर उधळलेला भाजपचा वारू रोखण्यासाठी आम्हाला कुठेच कमीपणा वाटणार नाही. भाजप हा आमचा क्रमांक एकचा शत्रू असून, त्यांना वगळून कुणासोबतही आघाडी करावी, असे स्पष्ट निर्देश आम्हाला असल्याचे खळबळजनक वक्तव्य शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केले. यासाठी आम्ही शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसशी चर्चा करून शिंदे गटासह अजित पवार गटाशी किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. यावेळी शरद पवार गटाचे निरीक्षक भास्करराव काळे देखील उपस्थित होते.

जिल्ह्यात मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमघ्ये पक्षाला पुन्हा विजयाच्या दिशेने नेण्यासाठी महाजन यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांबाबत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युती होणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दरम्यान, भाजपने बहुमतासाठी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे काही दिग्गज पक्षात घेण्यास सुरूवात केली आहे. ही भाजपची खेळी हाणून पाडण्यासाठीच शरद पवार गटाने शिंदे गटासह अजित पवार गटाशी हात मिळवण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे.

भाजप हा आमचा शरद पवार गटाचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आघाडी करण्याचे स्पष्ट निर्देश पक्ष श्रेष्ठींनी दिले आहेत. – प्रमोद पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट, जळगाव)