नाशिक विभागीय प्राथमिक फेरीला उत्साहात सुरुवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एरवी रंगमंचावर सादर होणारे नाटक प्रत्यक्षात करायला मिळत आहे. किंबहुना त्या नाटकाचा आपण भाग आहोत या उर्मीने युवा रंगकर्मीची सुरू असलेली धडपड ..काही मंडळी सादरीकरणासाठी लागणारे सामान जुळवाजुळव करण्यात मग्न..काही जण कलावंतांना दाद देण्यासाठी सभागृहातच थांबलेले.. बारकावे टिपणारे परीक्षक.. असे सर्वकाही येथील कुसुमाग्रज स्मारकात शुक्रवारी अनुभवयास मिळाले. त्यासाठी निमित्त ठरले ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या विभागीय प्राथमिक फेरीचे.

दोन दिवस प्राथमिक फेरी होणार असून परीक्षक तसेच आयरीस प्रॉडक्शनच्या प्रतिनिधींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी लोकसत्ता लोकांकिकाचे वेगळेपण दिसून आले. ब्लॅक आऊट, मोजक्याच काही साधनांसह आकारास आलेले नेपथ्य, संगीत, संवादांमधील जुगलबंदी यामुळे स्पर्धेची रंगत वाढली.

स्पर्धकांनी शेतकरी आत्महत्या, सभोवताली घडणारे अपघात, अध्यात्म, सामाजिक चालीरिती अशा विविध विषयांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. लासलगाव महाविद्यालयाने ‘नाटक बसत आहे’ या  एकांकिकेतून सौंदर्यशास्त्राकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडला. दु:ख, वेदना की सृजनता, यापैकी  सौंदर्य कशात दडलेले आहे, याविषयी भाष्य करण्यात आले. बी.वाय. के. महाविद्यालयाने ‘तुकाराम डाऊनलोडिंग’ मधून संत तुकाराम महाराज आणि आजची पिढी यांच्यात संवादाचा पूल बांधण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या कट्टय़ावर रमणारी मंडळी जेव्हा तुकारामांचा शोध घेतात, तेव्हां काय घडते हे मनोरंजनात्मक पद्धतीने मांडण्यात आले आहे. यासाठी अवघा रंग एक झाला, आनंदाची डोही आनंद तरंग, हेची दान देगा देवा, विसर न व्हावा या अभंगांचा वापर करण्यात आला. लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या वतीने ‘लंगर’ मधून लग्न झाल्यानंतर जागरणाच्या कार्यक्रमात लंगर तोडण्याची प्रथा याविषयी असणारी अंधश्रद्धा, स्त्री-पुरूष समानता विषय ग्रामीण ढंगात फुलवत नेला.  हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ‘चलो सफर करते है’ मधून नात्यांमध्ये अपेक्षांचे अवास्तव ओझे बाळगत होणारी घुसमट, मानवी संबंधातील ताण तणाव याकडे लक्ष वेधण्यात आले.

परीक्षकांनी स्पर्धकांना सादरीकरणासह संगीत, दिग्दर्शन, संहिता अशा वेगवेगळ्या पैलुंवर मार्गदर्शन करून काही सूचना केल्या. काहींच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली, तर काहींना सादरीकरणात असे का, असा प्रश्न विचारत स्पर्धकांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. संहितेसाठी आवश्यक वाचन, वाचिक अभिनयासह अन्य मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधत नाटकाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टुर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका-२०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टीमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर म्हणून तर एबीपी माझा न्यूज पार्टनर आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika 2018
First published on: 08-12-2018 at 01:05 IST