सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथे सोमवारी पहाटे एका घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. इगतपुरी येथील दरोड्याचा प्रकार नुकताच घडलेला असतांना सिन्नर तालुक्यातही दरोडा पडल्याने शेत शिवारात तसेच वस्तीपासून काही अंतरावर एकटे राहणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.

हेही वाचा- सातपूर औद्योगिक वसाहतीत विजेची हेराफेरी ? ; स्वत:चे देयक दुसऱ्याच्या माथी मारल्याची तक्रार

नांदुरशिंगोटे येथे नाशिक -पुणे मार्गावर सुभाष कराड यांचा बंगला आहे. रविवारी सायंकाळी कराड हे मुंबईहून गावी परतले. दरोडेखोरांनी सोमवारी मध्यरात्री कराड यांच्या बंगल्यात प्रवेश केला. हा सर्व प्रकार शेजारी असलेल्या मेंढपाळाने पाहिला. परंतु, मुंबईहून पाहुणे आले असावेत, असा त्यांचा समज झाल्याने मेंढपाळ घराकडे परत गेले. दरोडेखोरांनी दरवाजा बंद असल्याने खिडक्यांमधून डोकावून पाहिले. कराड यांची मुले अभ्यास करत असल्याने दरोडेखोरांनी काढता पाय घेतला. परंतु, कराड यांना आपल्या घराभोवती काही संशयास्पद हालचाली होत असल्याचे जाणवले. त्यांनी शेजारील लोकांना या \बाबत माहिती दिली. त्यानंतर दरोडेखोरांनी थोड्याच अंतरावर असणाऱ्या राजेंद्र शेळके यांच्या बंगल्याकडे आपला मोर्चा वळवला. याठिकाणी सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद झाला. या ठिकाणीही त्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र, घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या उशीखाली असलेला भ्रमणध्वनी आणि बॅटरी घेऊन ते पळाले.

हेही वाचा- जळगाव : मुक्ताईनगरमध्ये गुटखा तस्करी; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

त्यानंतर संतोष कांगणे यांच्या घरात प्रवेश करत सामानाची उलथापालथ केली. कांगणे यांच्या आई रतनबाई यांना चाकुचा धाक दाखवित अंगावरील दागिने काढून देण्याची धमकी देत सोन्याचे दागिने काढून घेतले. गंगाधर कांगणे यांच्या खोलीत असलेले साडेतीन लाख रुपये त्यांनी ताब्यात घेतले. दागिने आणि रोख रक्कम असा पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल दरोडेखोर घेऊन निघाले असता कांगणे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी कांगणे यांना वीट फेकून मारत पोबारा केला.

हेही वाचा- जळगाव : मालगाडीचे डबे घसरल्यामुळे भुसावळ विभागातील १२ रेल्वेगाड्या रद्द ; ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिन्नर, वावी तसेच सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरातील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्व घटनेत पाच ते सहा दरोडेखोर असून सीसीटीव्हीतील चित्रीकरणाच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी माधुरी कांगणे यांनी दिली. अलिकडेच इगतपुरी येथे दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले होते. या दरोड्यातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले असले तरी त्याचे साथीदार अजूनही फरार आहेत.