करोनाच्या सावटामुळे दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत, पुढील काळात दर वाढण्याची शक्यता
नाशिक : एरवी जूनच्या प्रारंभापासून शैक्षणिक साहित्य खरेदीची लगबग शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह सर्वत्र दिसून येते. यंदा शैक्षणिक वर्षांवर करोनाचे सावट असल्याने शैक्षणिक वर्षांच्या श्रीगणेशा ‘ऑनलाईन’ पध्दतीने झाला आहे. अद्याप प्रत्यक्षात शाळा सुरू न झाल्यामुळे पालकांकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याविषयी संभ्रम असल्याने दुकानांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीला फारसा प्रतिसाद नाही.
जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार तयारी केली जाते. नवीन पुस्तके, वह्य़ा, दप्तरे, पादत्राणे, छत्री अशी सामानाची यादी लांबतच राहते. पालकांकडून मुलांचा हिरमोड होऊ नये म्हणून त्यातल्या त्यात गरजेच्या वस्तू खरेदीवर जोर दिला जातो. यंदा मात्र शैक्षणिक खरेदीला करोनाचे ग्रहण लागले आहे. मार्चपासून बंद असलेली बाजारपेठ टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात काही अंशी खुली झाली. परंतु, शैक्षणिक साहित्याच्या बाजारपेठेला आजही ग्राहकांची प्रतिक्षा कायम आहे. करोनामुळे शाळा टप्प्या टप्प्याने भरणार आहेत.
काही शाळा ऑनलाइन पध्दतीने सुरू झाल्यामुळे विद्यार्थी घरी बसूनच अध्ययन करू लागले आहेत. इंग्रजी शाळांनी ठरवून दिलेल्या दुकानातून पुस्तक खरेदीची सक्ती केली जात आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत घरपोच पुस्तक वितरण होत आहे. या सर्वाचा अप्रत्यक्ष फटका पुस्तक विक्रेत्यांना बसला आहे. याविषयी सेंट्रल बुक डेपोचे भूषण सोमवंशी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदा खरेदीचा उत्साह आणि गर्दी नसल्याचे सांगितले. जून महिन्यात पालकांकडून ज्या प्रमाणात खरेदी होते ते चित्र यंदा दिसत नाही. ज्यांची ऑनलाइन शाळा सुरू झाली ते पालक तीन-चार वह्य़ा, पेन, पेन्सिल, रबर अशी किरकोळ खरेदी करत आहेत. वह्य़ा, पुस्तकांचे दर अद्याप आहे तसेच आहेत. पुढील काळातील मागणी पाहता येणाऱ्या मालाचे दर मात्र वाढण्याची चिन्हे असल्याचे सोमवंशी यांनी नमूद केले.
शालेय गणवेश विक्रेते प्रशांत ड्रेसेसचे चेतन धटिंगण यांनी अद्याप कुठल्याच पालकांनी शाळेच्या गणवेशाची विचारणा केलेली नसल्याने निराशा व्यक्त केली. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच माल भरून ठेवला होता. अद्याप तो तसाच पेटीत बंद आहे. शाळा जेव्हां सुरू होईल, त्यावेळी पालकांकडून एकदम विचारणा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शालेय साहित्याचे किरकोळ विक्रेते दीपक पाटील यांनीही आपली व्यथा मांडली. शाळेत लागणारे डबे, पाण्याच्या बाटल्या, हातरुमाल, हातमोजे, पायमोजे किंवा अन्य सामान किरकोळ स्वरूपात विकला जात असे. यातून खर्च सुटायचा. यंदा मात्र या सामानाविषयी विचारणाच नाही. शाळेसाठी लागणारे सामान सोबत आणायचे.
काही विकले गेले तर ठीक अन्यथा गोदामात ठेवून द्यायचे हा दिनक्रम सुरू आहे. पावसाळ्यात हा माल सांभाळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागत असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
शाळेने सांगितलेल्या दुकानातून खरेदी
शाळेने दिलेल्या यादीप्रमाणे ज्या दुकानातून सांगितले, त्या दुकानातून खरेदी केली. काही वह्य़ा घरीच होत्या. अन्य नव्या शैक्षणिक साहित्याची खरेदी केली नाही. त्यासाठी चार दुकाने फिरून गर्दीत जाण्याची मानसिक तयारी नाही. तसेच शाळा ज्या वेळी प्रत्यक्ष सुरू होईल, त्या वेळी मुलांनी मागितल्याप्रमाणे ती खरेदी केली जाईल. तूर्तास जे उपलब्ध आहे त्यातच अभ्यास नियमित करा असा सल्ला मुलांना दिला आहे.
– सुजाता कोपरकर (पालक)