नाशिकमध्ये मनसेकडून मोफत पाणी टँकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील पाणी टंचाईला राज्यातील सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याची तोफ डागत महापालिकेतील सत्ताधारी मनसेने शनिवारपासून ‘मोफत पाणी टँकर’ योजनेचा श्रीगणेशा केला. आगामी पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, शिवसेनेने पाण्यासह विविध मुद्यांवर मोर्चाद्वारे भाजपला घेरण्याची तयारी चालवली आहे. मनसेने मागेल त्याला मोफत टँकर देण्याचे जाहीर करत टंचाईच्या प्रश्नावरून भाजपची कोंडी करण्याचे धोरण आखल्याचे अधोरेखीत झाले आहे.

पाणी कपातीमुळे त्रस्तावलेल्या शहरवासीयांच्या लेखी या समस्येला भाजपला जबाबदार ठरविण्याची सेना आणि मनसेमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. शासनाच्या चुकलेल्या नियोजनामुळे नाशिकला टंचाईला तोंड द्यावे लागले.

जायकवाडीसाठी मुबलक पाणी सोडून शासनाने नाशिककरांवर अन्याय केल्याचे टिकास्त्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोडले. शहरासाठी पुरेसे पाणी असून कपातीची गरज भासणार नसल्याचे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते. या प्रश्नावर तोडगा काढण्याची त्यांची जबाबदारी होती. परंतु, मागील महिन्यात त्र्यंबकेश्वरला येऊनही नाशिक शहरात न येता ते परस्पर निघून गेले, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.  राज्य शासन, पालकमंत्री व भाजपचे आमदार या प्रश्नात वेगळेच राजकारण करत असल्याचे सांगत मनसेने टंचाईवर मात करण्यासाठी मोफत पाणी टँकर सुरू केल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. जून २०१६ पर्यंत ही योजना मनसे सुरू ठेवणार आहे. त्या अंतर्गत मागेल त्या भागात, मागेल त्यास टँकरमार्फत मोफत पाणी दिले जाईल, असे सांगण्यात आले. यासाठी नागरिकांनी मनसेच्या राजगड कार्यालयात २३१७७७८ या क्रमांकावर अथवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra navnirman sena providing free water tank in nashik
First published on: 06-03-2016 at 02:55 IST