इस्पॅलियर शाळेत उद्या पाहता येणार

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ या शिक्षणप्रणालीचा आणि त्यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने गांधी यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने इस्पॅलियर स्कूलमध्ये महात्मा गांधी यांचे सर्वात मोठे धातू शिल्प साकारण्यात आले आहे. शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे धातू शिल्प येत्या २ ऑक्टोबर रोजी नाशिककरांना पाहता येणाार आहे.

मूर्तिकार श्याम लोंढे यांनी या धातू शिल्पाची रचना आणि निर्मिती केली असून त्याआधी महेश बच्छाव यांनी धातू शिल्पाचे संकल्पचित्र तयार केले. त्यानंतर ३० लेझर स्तंभाच्या माध्यमातून ते शिल्प उभारण्यात आले. यामध्ये अभियांत्रिकी ज्ञान आणि दृष्टी विज्ञान यांचा उपयोग करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांचे अशा प्रकारे धातू शिल्प साकारण्यात आले आहे.

आपणास एक आगळी-वेगळी कलाकृती निर्मिती करण्याची संधी मिळाली. मंडेला यांच्या कलाकृतीवर प्रेरित होऊन ही निर्मिती केली आहे. धातू शिल्पाच्या एका विशिष्ट कोनात उभे राहिल्यानंतरच गांधी यांच्या चेहऱ्याची प्रतिमा आपल्याला दिसते, असे लोंढे यांनी सांगितले. तर अनुभवातून शिक्षणपद्धती कशी असली पाहिजे, याविषयी हे शिल्प मार्गदर्शन करते. महात्मा गांधीजींना जेव्हा दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून बाहेर काढण्यात आले, त्या प्रसंगावर आधारित तसेच गांधीजींचे जीवनपट उलगडून दाखविणारी ‘मोहन टू महात्मा’ हे अनोखे ग्रंथालयही शाळेच्या आवारात साकारण्यातआले असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

३० जानेवारी, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि पाच सप्टेंबर या दिवशीही पर्यटकांना ही कलाकृती पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.महात्मा गांधी यांच्या धातू शिल्पाची वैशिष्टय़े३० लेझर धातू स्तंभ, २० फूट उंची, १८ फुट रुंदी असलेले गांधी यांचे धातूशिल्प. ते पाहण्यासाठी त्रासदायक ठरू नये यासाठी जमिनीपासून २५ फूट उंची ठेवण्यात आली आहे. शिल्प तयार होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या स्तंभ धातू शिल्पाची नोंद करण्यात आली आहे.