नाशिक : टाळेबंदीचे निर्बंध शिथील होत असताना जिल्ह्य़ातील रुग्णांचा आलेख उंचावत आहे. मालेगावमध्ये प्रसार रोखण्यात यश येत असतांना नाशिकमध्ये मात्र विपरित चित्र आहे. आर्थिक, मनुष्यबळ आणि अन्य निकषांवर नाशिक आणि मालेगाव महापालिकेची तुलना होऊ शकत नाही. परंतु, करोनावर नियंत्रण मिळविण्यात मालेगाव महापालिका नाशिकपेक्षा सरस ठरल्याचे चित्र आहे.
गुरूवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात शहर, ग्रामीण भागात नवीन नऊ रुग्ण आढळले. जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या १७३३ वर पोहचली. यातील ११३० रुग्ण बरे झाले. तर करोनाने आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांमध्ये तीन नाशिक शहरातील, तीन मालेगावातील आहेत. उर्वरित दोन येवला तर एक जळगावच्या पारोळा येथील आहे. सलग अडीच महिने अनुभवलेल्या टाळेबंदीच्या निकषात बदल करून दैनंदिन व्यवहार पूर्ववत होत आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखाने आधीपासून सुरू आहेत.
आर्थिक व्यवहार सुरळीत करताना करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. काही दिवसांत नाशिक शहरात रुग्णांचा आलेख झपाटय़ाने विस्तारला. मालेगाव शहरात दाट लोकवस्तीच्या भागात वेगाने फैलाव झाल्याचा अनुभव आहे. तेथील स्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. मालेगावमध्ये जे शक्य झाले, ते नाशिक शहरात का घडत नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मालेगावात रुग्णसंख्या अधिक असूनही पोलीस, महापालिका, आरोग्य विभाग अशा सर्व यंत्रणांच्या प्रयत्नातून त्यावर काहीअंशी नियंत्रण मिळवता आले. मालेगावच्या उलट नाशिकमध्ये स्थिती आहे. नाशिक महापालिका आर्थिक, मनुष्यबळ आणि अन्य सर्व पातळीवर सक्षम आहे.
तरीदेखील प्रादुर्भाव रोखण्यात मालेगावप्रमाणे नाशिक महापालिकेला यश मिळाले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
फरक काय ?
नाशिक शहरात २४ तासात करोनाच्या नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ५१५ च्या घरात पोहचली. गुरूवारी प्राप्त अहवालात बाधितांमध्ये समर्थनगर येथील तिघांचा समावेश आहे. करोनामुळे २४ जणांचा मृत्यू झाला. उपचाराअंती १८३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या ३०८ रुग्ण उपचार घेत आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात करोनाचे आतापर्यंत ८५८ रुग्ण आढळले. यातील ७१२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. ६४ जणांचा मृत्यू झाला तर सध्या ८२ रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात बरे होणाऱ्यांची टक्केवारी ३७.३५ इतकी असून मालेगावमध्ये हे प्रमाण ८२.९८ टक्के आहे. काही दिवसात मालेगावमधील करोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळाले.