मालेगाव : आगामी महापालिका निवडणूक शांतता व निर्भय वातावरणात पार पडावी म्हणून पोलीस यंत्रणेने सतर्कता बाळगत विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याच अनुषंगाने घातक अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलीस दलातर्फे विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. असे असले तरी, मालेगाव शहरात गावठी पिस्तूल सारखे घातक शस्त्रे आढळून येण्याच्या घटना समोर येतच आहेत. ताज्या प्रकरणात तीन गावठी पिस्तूल व तीन रिकाम्या मॅगझिनसह दोन जणांना पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. संशयीतांनी हे पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने शहरात आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मालेगाव शहरात दोन जण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई करून राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलजवळ दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन गावठी बनावटीचे पिस्तूल व तीन रिकामी मॅगझिन आढळून आली. इमरान गफ्फार शेख (२८) व मोमीन राशिद अंजुम (३१) अशी या दोघांची नावे असून ते मालेगावमधील रहिवासी आहेत. पिस्तूल, मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे.
या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघा संशयीतांनी हे पिस्तूल कुठून आणले होते व ते कोणाला विक्री करणार होते, याचा शोध पोलिसातर्फे घेण्यात येत आहे. प्राथमिक तपासात हे दोघे संशयीत एका गुन्हेगाराच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तीन पिस्तुलांची तस्करी करण्याचा प्रयत्न झाल्याने त्यातील गांभीर्य ठळकपणे समोर येत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, सहाय्यक निरीक्षक प्रीती सावंजी, उपनिरीक्षक पाराजी नागमोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
दहा दिवसांपूर्वी लहान मुलांच्या भांडणातून गोळीबार करण्याचा प्रकार शहरातील आयेशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यापूर्वी देखील शहरात गावठी पिस्तूल आढळून आली होती. संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे,ही पोलिसांसाठी मोठी कसोटी असते. अशा स्थितीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात गावठी पिस्तूल विक्री करण्याचा प्रयत्न होणे, ही चिंताजनक बाब मानली जात आहे. शहरात हे पिस्तूल कुठून येतात आणि त्याच्यामागे कोण हस्ती आहेत,याची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढावीत,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
