जिल्ह्य़ात यंदा ७.४० लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्र होते. त्यापैकी तीन लाख ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ५० हजार ९७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, कांदा, द्राक्ष पिकांचा समावेश आहे. या तालुक्यातील १५० गावांतील ८१ हजार १६९ शेतकरी बाधित झाले आहेत.

नांदगाव तालुक्यात ४५ हजार ३२ हेक्टरवरील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग, कापूस कांद्याला झळ बसली. सिन्नर तालुक्यात ३८ हजार ९० हेक्टरवरील भात, बाजरी, मका, सोयाबीन, भुईमुग, भाजीपाला डाळिंब, कांदा रोपे बाधीत झाली. सटाणा तालुक्यात ३० हजार ५८९ हेक्टरवरील नागली, भात, बाजरी, सोयाबीन, भुईमुग, मका, कापूस, भाजीपाला, डाळिंब आणि द्राक्षे बाधित झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. निफाड तालुक्यातील ३४ हजार ३४८ हेक्टर, चांदवड २८ हजार ४९२, येवला तालुक्यात ३७ हजार ६२९, कळवण सहा हजार ९६९, दिंडोरी २६५१, देवळा १५ हजार २८९, नाशिक ४८८३, त्र्यंबकेश्वर ५४१९, सुरगाणा ११.८५, इगतपुरी ४८९ याप्रमाणे पेठ वगळता उर्वरित १४ तालुक्यांत तीन लाख ८३२ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

मका, द्राक्ष जमीनदोस्त

पीकनिहाय विचार केल्यास मका लागवडीखालील क्षेत्र २.२५ लाख हेक्टर होते. त्यापैकी ७० टक्के पिकाचे नुकसान झाले. जिल्ह्य़ात ६० हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत. त्यातील ७० टक्के बागांचे नुकसान झाले. म्हणजे हंगामात द्राक्ष उपलब्ध होतील, याची शक्यता धूसर झाली आहे. १.१० क्षेत्रावरील बाजरीपैकी ५० ते ६० टक्के नुकसान झाले. सोयाबीनची ७३ हजार हेक्टरवर लागवड होती. त्यातील ८० टक्के पिकाचे नुकसान झाले.

लेट खरीप कांद्याचे ५० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४० टक्के नुकसान झाले. भात पिकाला पावसाचा फारसा फटका बसला नाही. कडधान्याची आधीच काढणी झाल्यामुळे त्यांचे फारसे नुकसान झाले नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

साडेचार लाखांहून अधिक शेतकरी बाधित

परतीच्या पावसाचा १,६१४ गावांमधील चार लाख ५२ हजार ९३१ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक ८१ हजार १६९, तर सुरगाणा तालुक्यात सर्वात कमी ४६ शेतकरी आहेत. पेठ तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नाही. हा तालुका वगळता सटाणा तालुक्यात ५४ हजार २१२, नांदगाव ३७ हजार ५१३, कळवण ३० हजार २४१, दिंडोरी ४२४०, देवळा २६ हजार ५८९, नाशिक पाच हजार, इगतपुरी १५४१, त्र्यंबकेश्वर १३ हजार ५७०, निफाड ६२ हजार ६८५, चांदवड ५८ हजार ५६१, येवला २९ हजार २३४, सिन्नर ४८ हजार ३३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.