मालेगाव : महापालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या ५०० कोटी खर्चाच्या महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेच्या मलशुद्धीकरण केंद्रांतर्गत विद्युतीकरण कामात गंभीर स्वरूपाची तांत्रिक गफलत झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कामावर झालेला सव्वा कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत मंजूर असलेल्या ४६२ किलोमीटर अंतराच्या येथील बहुचर्चित भुयारी गटार योजनेचा मार्च २०२४ मध्ये शुभारंभ झाला. मंजूर कामांपैकी आतापर्यंत २६० किलोमीटर अंतराच्या अंतर्गत जलवाहिन्या तसेच मुख्य मलशुद्धीकरण केंद्रांपर्यंतच्या मोठ्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. घरगुती सांडपाणी संकलनासाठी वापरलेल्या जलवाहिन्या क्षमतेपेक्षा कमी व्यासाच्या असल्याचा आक्षेप घेत त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होण्याची भीती शहरवासीयांकडून सुरुवातीपासून व्यक्त केली गेली. पालिका प्रशासनाकडून या कामाबद्दल घेण्यात येणारे सर्व आक्षेप निरर्थक असल्याचे स्पष्टीकरण दिले गेले.
तांत्रिकदृष्ट्या हे काम योग्य असल्याचा दावाही केला गेला. तथापि, मलशुद्धीकरण केंद्रातील उघड झालेला तांत्रिक दोष व त्यावर झालेला खर्च वाया जाण्याची निर्माण झालेली शक्यता यामुळे महापालिकेच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.
वास्तव काय ?
या योजनेंतर्गत म्हाळदे शिवारात मलशुद्धीकरण केंद्र आहे. संकलित सांडपाण्याचा उपसा करण्यासाठी या केंद्रात मोठ्या क्षमतेचे विद्युत पंप बसवावे लागणार आहेत. त्या अनुषंगाने वीज उपकेंद्रापासून या केंद्रापर्यंत ३३ केव्ही क्षमतेच्या विशेष वीज वाहिन्या टाकण्यात आल्या. परंतु, मलशुद्धीकरण केंद्रातील अंतर्गत विद्युतीकरणाची कामे केवळ ११ केव्ही क्षमतेची करण्यात आली. परिणामी बाहेरून आलेला अधिक क्षमतेचा विद्युत पुरवठा आणि मलशुद्धीकरण केंद्रात झालेली कमी भारवहन क्षमतेची विद्युतीकरण कामे, या तफावतीमुळे तांत्रिकदृष्ट्या वीज जोडणी अशक्य झाली आहे.
खर्च किती
३३ केव्ही क्षमतेच्या वीज वाहिन्या टाकण्याचे काम मनपाच्या विद्युत विभागाने तर, मलशुद्धीकरण केंद्रातील अंतर्गत विद्युतीकरणाची ११ केव्ही क्षमतेची कामे स्थापत्य विभागाकडून करण्यात आली. या कामांवर अनुक्रमे महापालिकेला जवळपास एक कोटी ४० लाख आणि मलशुद्धीकरण केंद्रातील कामासाठी सव्वा कोटींचा खर्च करावा लागला. ही दोन्ही कामे विद्युत विभागाच्या अधिपत्याखाली होणे आवश्यक असताना अंतर्गत विद्युतीकरण कामात स्थापत्य विभागाने नाक खुपसले. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत त्यातील तांत्रिक दोष लक्षात येऊ शकला नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. आता विद्युतीकरणाची कामे अतिरिक्त बाब म्हणून नव्याने सुरु करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
मलशुद्धीकरण केंद्रात कमी भारवहन क्षमतेची विद्युतीकरण कामे केली गेल्याची तांत्रिक चूक लक्षात आली आहे. त्यामुळे तेथे आवश्यक त्या भारवहन क्षमतेची विद्युतीकरण कामे नव्याने करण्याचे नियोजन आहे. आधीच्या कामावर झालेला खर्च वाया जाईल, असे मात्र म्हणता येणार नाही. रवींद्र जाधव (आयुक्त तथा प्रशासक, मालेगाव महानगरपालिका)