|| चारूशीला कुलकर्णी
जिल्हा रुग्णालयाच्या कारभारात अनेक त्रुटी; संघटनेच्या तक्रारी
नाशिक : करोना कक्षापासून वरिष्ठ डॉक्टर दूरच..नातेवाईकांना रुग्णांविषयी माहिती देण्यास वरिष्ठ जागेवर नसणे.. त्यांचे भ्रमणध्वनी सातत्याने संपर्क क्षेत्राच्या बाहेर असणे..करोना कक्षात काम करणाऱ्या परिचारिकांना निकृष्ट दर्जाचे भोजन, अशा एक ना अनेक तक्रारी करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कारभाराविषयी रुग्णांसह परिचारिका संघटनेने मांडल्या आहेत.
करोना रुग्णालय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाची जबाबदारी अधिक आहे. जिल्हा शल्य चिकित्सक प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही दिवस रजेवर होते. त्यांची जबाबदारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखील सैंदाणे यांच्यावर आली. करोना नियंत्रण कक्षाची जबाबदारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्याकडे आहे.
वरिष्ठ प्रशासकीय बैठकांमध्ये गुंतल्याने त्यांची जबाबदारी आठ वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका पेलत आहेत. रुग्णांना भोजन चांगल्या दर्जाचे मिळत नाही. त्यांच्याशी परिचारिका किंवा वैद्यकीय अधिकारी व्यवस्थित बोलत नाही. वरिष्ठांशी संपर्क झालाच तर ही जबाबदारी इतरांची असल्याचे सांगितले जाते. योग्य उपचार होत नसून वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याची हतबलता येथे उपचार घेणारे रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करतात.
रुग्णांच्या काही तक्रारींना परिचारिकांकडूनही दुजोरा मिळत आहे. करोना कक्षात दोनच वैद्यकीय अधिकारी काम करतात. सद्यस्थितीत १३७ रुग्ण आहेत. प्रत्येक रुग्णाच्या तापमानाची नोंद घेणे, औषध देणे आणि तत्सम कामे परिचारिका करतात.
परिचारिकांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्यक्ष करोना कक्षात काय सुरू आहे, याबद्दल स्वत वरिष्ठ अनभिज्ञ आहेत. अलिकडेच अचूक माहिती सादर केल्याबद्दल वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यामुळे करोना कक्षात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
वरिष्ठांकडून केवळ आदेश देण्याचे काम
करोना कक्षात काम करण्यास कोणीही तयार नाही. वरिष्ठ संरक्षण पोषाख परिधान करत नाहीत. केवळ हातमोजे बांधून, मुखपट्टी लावून आदेश देतात. परिचारिकांना रुग्णांचे सारे काही पहावे लागते. करोना कक्षात केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत. त्यांच्यावर येणारा कामाचा ताण पाहून परिचारिका सर्व काही सांभाळतात. याबद्दल दाद मागण्याचा प्रयत्न केला तर वरिष्ठ दालनात उभेही करत नाही. करोना कक्षात संरक्षण पोषाखामुळे कित्येक तास पाणी पिता येत नाही, जेवणही करता येत नाही. अतिशय निकृष्ट दर्जाचे भोजन देऊन कर्मचाऱ्यांची बोळवण होते. करोना कक्षात काम करणाऱ्या १५ परिचारिकांना कक्षातील कामाऐवजी लिपिकांच्या कामात अडकवून रुग्णांची माहिती मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व कामे दबाव टाकून करून घेतली जातात.
– पूजा पवार (अध्यक्ष, नाशिक जिल्हा परिचारिका संघटना)
एकमेकांना सहाय्यतेची गरज
करोना ही आपत्ती असून एकमेकांना सहाय्य करण्याची गरज आहे. भोजनाच्या तक्रारीवर ठेकेदारांशी बोलणे सुरू आहे. त्याला आवश्यक सूचना देण्यात येतील. करोना कक्षात आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवर्तन पध्दतीने नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक जण आपली जबाबदारी पार पाडत आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था आहे. परंतु, काय प्रकार घडला, याची माहिती घ्यावी लागेल.
– डॉ. सुरेश जगदाळे (जिल्हा शल्य चिकित्सक)
वडिलांना १२ जुलै रोजी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. कुठलीही तपासणी न करता त्यांना करोना संशयित कक्षात ठेवण्यात आले. वडील दोन दिवस रुग्णालयात होते. पण कोणीही वैद्यकीय अधिकारी तपासणीला आले नाहीत. परिचारिकांना अनेक वेळा सांगावे लागायचे. वडिलांना नेमका काय त्रास होतोय, हे कोणीही सांगितले नाही. अखेर त्यांना मविप्रच्या रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. रुग्णवाहिका बोलावली. ती दोन तास उशीराने आली. त्यात ऑक्सिजनची व्यवस्था नव्हती. रुग्णालय व्यवस्थापनाने ऑक्सिजनयुक्त सिलिंडर दिले पण, काम झाले की परत करण्याच्या अटीवर. जिल्हा रुग्णालयाच्या अटी-शर्ती मान्य करत मविप्रमध्ये पोहचलो. परंतु, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांचा रात्रीच मृत्यू झाला.
– तुषार थोरात (मृत नातेवाईकांचा मुलगा)