वडिलोपार्जित व्यवसाय सोडून वेगळी वाट, काहींची पडेल ते काम करण्याची तयारी
चारूशीला कुलकर्णी, लोकसत्ता
नाशिक : करोना संसर्गामुळे जाहीर टाळेबंदीने सर्वाना घरात रहावे लागले असले तरी त्यांच्या चरितार्थाचा आणि बेरोजगारीचा प्रश्न जटील झाला. हा गुंता सुटावा यासाठी रोजगाराच्या नव्या संधी शोधण्याचा प्रयत्न अनेक जण करीत आहेत.
टाळेबंदीमुळे कंत्राटी कामगार, मोलमजुरी करणारे तसेच रोज भांडवल गुंतवत कमविणाऱ्या लोकांचा हातातील काम गेले. करोना नियंत्रणाविषयी असणारी अनिश्चितता पाहता अनेकांनी आपले गाव गाठले. स्थानिक कंत्राटी कामगार, मजुरांना मात्र वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्य़ात त्र्यंबक, वणी या धार्मिक पर्यटनावर चालणाऱ्या लहानश्या गावांमध्ये तर ही समस्या अधिकच बिकट झाली.
टाळेबंदी आणि करोनामुळे पर्यटक येत नसल्याने देवस्थानावर अवलंबून पौरोहित्य, पुजेसाठी लागणारी फुले आणि अन्य सामान, प्रसाद आदी दुकाने तीन महिन्यांपासून बंद आहेत. बस स्थानकापासून मंदिर परिसरापर्यंत भाविकांना नेणारे रिक्षाचालक यासह या सर्व कामांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या लोकांनी वडिलोपार्जित सुरू असलेला व्यवसाय सोडत वेगळी वाट निवडली आहे.
शंभु महाले यांनी रिक्षा बंद असल्याने रिक्षाचा हप्ता आणि महिन्याचा खर्च भागावा यासाठी जवळच्या गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जात तेथून ताजा भाजीपाला आणून शहरात ठिकठिकाणी विकणे सुरू केले. यातून त्यांचा रोजचा खर्च सुटतो. फारसे काही हातात पडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रांगोळीकार तसेच सजावटकार नीलेश देशपांडे यांनी सजावट आणि रांगोळी हे आवडीचे काम, पण तीन महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने कामे बंद असल्याचे सांगितले.
पुढील किती काळ ही अनिश्चिता राहील हे माहिती नाही. यामुळे तंत्रज्ञानाचा आधार घेत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. यामध्ये भाजीपाल्यासह वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थही ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.
गृहिणी असलेल्या अनुजा कुलकर्णी यांनी महिला वर्गाला कंटाळा वाटणाऱ्या ‘पोळ्यांचा रतीब’ या अनोख्या संकल्पनेला मूर्त रुप दिले. घडीची पोळी, फुलके, बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीची घरपोच सेवा देण्यास सुरूवात केली आहे.
पडेल ते काम करण्याची तयारी
टाळेबंदी लागू होताच १० ठिकाणचे घरकाम सुटले. लोक काही आणून देत होते. परंतु, झोपडपट्टीतील लोक ती मदत आमच्यापर्यंत पोहचू देत नव्हते. किती दिवस दुसऱ्याच्या मदतीवर जगणार? त्यामुळे जमवलेल्या पैशातून मुलाला भाजीपाल्याचे दुकान लावून दिले. मी बांधकामाच्या ठिकाणी, मसाल्याच्या दुकानात मिरच्या निवडून दे, मसाला कुटून दे, उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणावर गहु तांदूळ भरले जातात ते निवडून दे अशी कामे सुरू केली. दिवसाकाठी तीन वेळा केवळ फरशी पुसणे, असे जो जे काम सांगेल ते करत आहे. हात चालतोय तोवर काम करायचे. अजून पंतप्रधान योजनेचे ५०० रुपये खात्यावर आले नाहीत.
– शांताबाई दबडगे (घर कामगार)