शेतकरी संपाच्या समर्थनार्थ दुसऱ्या दिवशी जिल्ह्य़ात राजकीय पक्षही मैदानात उतरल्याचे दिसून आले. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कचरू डुकरे यांच्या नेतृत्वाखाली घोटी बाजार समिती आवारात शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. नांदगाव तालुक्यात शेतकऱ्यांकडून मालवाहू वाहनांची तपासणी करण्यात येऊन ज्या वाहनात कृषिमाल असेल ती परत पाठविण्यात येत होती. देवळा तालुक्यात ठिकठिकाणी शासनाच्या निषेधार्थ फेऱ्या काढण्यात आल्या.

शेतकरी संपामुळे ग्रामीण भागातीलही जनजीवन विस्कळीत झाले असून दूध व भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. इगतपुरी, घोटीत दूध पिशव्याही उपलब्ध झाल्या नाहीत. काँग्रेसने संपाला पाठिंबा देत समृद्धी महामार्ग हटाव, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना पेन्शन द्यावे, शेतमालास हमीभाव द्यावा, अशा मागण्या केल्या आहेत. घोटी बाजार समिती आवारात काँग्रेसने घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून सरकारचा निषेध केला. यावेळी आमदार निर्मला गावित, तालुकाध्यक्ष डुकरे, मधुकर कोकणे, बाळासाहेब वालझाडे आदी उपस्थित होते.

नांदगावमध्ये पहाटे चारपासून शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते तालुक्यातील मुख्य रस्त्यावर उभे राहून प्रत्येक वाहनाला थांबवून त्यात शेतमाल आहे का याची खात्री करत होते. शेतमाल दिसला तर तो खाली उतरवून वाहने परत पाठवत होते. बाजार समितीत भाजीपालाच आला नाही. शहरातील फुले बाजारात कार्यकर्त्यांनी फिरून भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने बंद केली. दिवसभर विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते गावात फिरून शेतकरी संपाला साथ देण्याचे आवाहन करीत होते. सकाळी शहरातील गंगाधरी उड्डाण पुलाजवळ, पिंपरखेड, वाडी फाटा, न्यायडोंगरी, मनमाड चौफुली, पोखरी, साकोरा येथे बाजारात विक्रीसाठी येणारा भाजीपाला उतरवून तिथेच रस्त्यावर टाकण्यात आला. विक्रीसाठी आलेली भेंडी हुतात्मा चौकात आणून टाकण्यात आली. संपामुळे नेहमी गजबजलेल्या शहरातील रस्त्यावर भाजीपाला विक्रेते नसल्याने रस्ते मोकळे झाले होते.

देवळा तालुक्यात ठिकठिकाणी राज्य सरकारच्या निषेधार्थ फेऱ्या काढण्यात आल्या. भऊर, खर्डे येथे आठवडे बाजार रद्द करण्यात आला.  दहिवड येथे पुतळा दहन व फेरी काढून संप अजून तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. देवळा व उमराणा बाजार समितीत माल न आल्याने शुकशुकाट होता. खेडय़ापाडय़ातून शेतमाल देवळ्यात न आल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला. दूध नसल्याने उपहार गृहांमध्ये बिनदुधाचा चहा देण्यात आला. दहिवड ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शनिवारी सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार आहेत.