वैद्यकीय देखरेखीखालील २६ जण घरी

नाशिक : विदेशातून येथे परतलेल्या १२१ प्रवाशांना आतापर्यंत जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यातील ३१ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्वाचे नमुने नकारात्मक आले आहेत.

वैद्यकीय देखरेखीखालील २६ जणांना रुग्णालयातून घरी  सोडण्यात आले असून सध्या पाच जण देखरेखीखाली आहेत. २९ प्रवाशांचा वैद्यकीय देखरेखीखालील विहित कालावधी पूर्ण झाला आहे. दुसरीकडे करोना संशयितांचा टोल नाक्यावर तपासणीद्वारे शोध घेतला जात आहे.

बुधवारी दुपापर्यंतच्या स्थितीची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल्ह्य़ात आतापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात एकही करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. चार प्रवाशांचे अहवाल अद्याप अप्राप्त असून त्याकडे सर्वाचे लक्ष आहे.

विदेशातून परतलेल्या प्रवाशांच्या तपासणीकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध घातले गेले आहे. विदेशातून आलेल्या प्रवाशांना जिल्हा रुग्णालय अथवा त्यांच्या घरीच १४ दिवस विलग ठेवले जाते. या काळात वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे.

अनेकदा विदेशातून आलेले प्रवासी माहिती देणे टाळतात. संबंधितांना धुंडाळणे हे प्रशासनासमोरील आव्हान आहे. अनेक रुग्णांची माहिती शेजारील व्यक्तींकडून यंत्रणेला प्राप्त होत आहे. राज्यातील तसेच देशातील करोनाबाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे. टोल नाका व्यवस्थापन आणि वाहन चालकांनी करोना संशयित प्रवासी आढळल्यास त्याची माहिती यंत्रणेला द्यावी, याबाबतचे माहितीपत्रक वितरित केले जात आहे.

शहरात आतापर्यंत सुमारे २० देशांमधून एकूण १५० प्रवासी आले आहेत.

त्यापैकी १२१ जणांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले. ३१ जणांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या सर्वाचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले. सर्वाचे नमुने नकारात्मक आल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

पर्यटकांसाठी अभयारण्य बंद

करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी विभागातील अहमदनगर येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य, नाशिक येथील नांदुर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य, धुळे येथील अनेर डॅम वन्यजीव अभयारण्य आणि जळगांव येथील यावल वन्यजीव अभयारण्य ३१ मार्चपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अ. मो. अंजकर यांनी कळविले आहे.