सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या सृजनशील निर्मात्यांना व्यासपीठ मिळावे यासाठीे २०१० मध्ये अंकुर फिल्म फेस्टिव्हलची सुरूवात करणाऱ्या अभिव्यक्तीने नवोदित चित्रपट निर्मात्यांचे संघटन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील अभिव्यक्तीच्या सहशिक्षण कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

अभिव्यक्तीने नवोदित निर्मात्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या निर्मितीचे परीक्षण व्हावे यासाठी दर वर्षी अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करून लोकांमध्ये माध्यमांबद्दलची आस्था निर्माण केली आहे. ही आस्था सातत्याने टिकावी व समाजात परिवर्तनाची प्रक्रिया दृढ करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्रातील नवोदित  निर्मात्यांचे संघटनतयार करण्याचा प्रयत्न अभिव्यक्तीच्या वतीने होत आहे.

या संघटनमधून नवोदितांना चित्रपट निर्मिती संदर्भाचे विविध तंत्र व कौशल्य, सामाजिक दृष्टिकोन, रसग्रहण, संकलन, चालू घडामोडींवर कार्यशाळांचे आयोजन करून त्यांची क्षमता व दृिष्टकोन विकसित करून त्यांच्या माध्यमांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे संघटन कशा प्रकारे महाराष्ट्रात कार्यान्वित होईल, त्याचे ध्येय, उद्दीष्टे, मूल्य आणि प्रत्येकाची बांधिलकी काय असेल, यावर बैठकीत मंथन होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील अधिकाधिक नवोदित चित्रपट निर्मात्यांनी या संघटनमध्ये सामील होण्याचे आवाहन अभिव्यक्तीचे कार्यक्रम प्रमुख भिला ठाकरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२१५५९७८ किंवा ०२५३-२३४६१२८ या क्रमांकावर संपर्क साधावा.