शिक्षण विभागाकडून महापालिका शाळांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नािशक : करोना विषाणूचा संसर्ग आणि टाळेबंदी या पार्श्वभूमीवर सुरू असलेले स्थलांतर हे चित्र आता रोजचे असले तरी शिक्षण विभागासाठी ते मारक ठरत आहे. टाळेबंदीमुळे सुरू झालेल्या उपासमारीला कंटाळून जिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे. त्यात चिमुकल्यांचीही संख्या लक्षणीय असल्याने शाळेच्या पटसंख्येवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून महापालिकेच्या शाळेसाठी ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

टाळेबंदीमुळे अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले. या उद्योगांवर शहर, जिल्हा तसेच इतर राज्यातील मजूर, कामगार अवलंबून होते. दोन महिन्यांपासून औद्योगिक वसाहतीतील यंत्राचा आवाज थांबला तसा मूळ नाशिकच्या नसलेल्या कामगार, मजुरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. जवळची जमा पुंजी संपत असतांना घरमालकाने तगादा लावला म्हणून मोजक्या सामानासह आपल्या चिमुकल्यांना सोबत घेत या मंडळींनी गावचा रस्ता धरला आहे.

जिल्ह्य़ात दिंडोरी, गोंदे, इगतपुरी, सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीसह अन्य भागात बाहेरून आलेले मिळेल त्या वाहनाने आपआपल्या गावी परतू लागले आहेत. दुसरीकडे, करोना संसर्गाची भीती असल्याने अनेकांनी पुन्हा न येण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वाचा विपरीत परिणाम शिक्षण विभागावर होणार आहे. विद्यार्थी शाळा सोडून जात असल्याने त्या त्या शाळांची पटसंख्या कमी होणार असून याचा फटका शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गास बसणार आहे. त्यातच सध्या आधार कार्ड ऑनलाइन अपडेटची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे ३० स्पटेंबपर्यंत शाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट होण्याची संख्या नाकारता येत नाही. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून ऑनलाइन अभ्यास वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणे सुरू आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न होत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी नमूद केले.

स्थलांतरित विद्यार्थीही शहराबाहेर जात आहेत. यामुळे त्या त्या भागातील शाळांमधून किती विद्यार्थी कमी झाले, हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. स्थलांतराचा फटका बसणार हे निश्चित. नेहमी मे महिन्यात शिक्षकांच्या मदतीने पट नोंदणी अभियान राबविले जाते. यंदा मात्र करोनाचे सावट असल्याने गुगल लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस आरंभ केला आहे. अद्याप शासनाकडून कुठल्याही प्रकारची सुचना न आल्याने जूनच्या पहिल्या आठवडय़ात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची माहिती जमा करण्यास सुरूवात होईल.

– डॉ. वैशाली झणकर-वीर  (प्राथमिक शिक्षणाधिकारी)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Migration impact on school attendance zws
First published on: 15-05-2020 at 02:02 IST