स्थानिकांच्या मुक्कामात वाढ

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे विदेशी पक्ष्यांनी आपला मुक्काम हलविला असून स्थानिक पक्ष्यांनी मात्र आपला मुक्काम अभयारण्य परिसरात वाढविला आहे. अभयारण्य परिसरात स्थानिक पक्ष्यांसह कोल्हे तसेच

इतर वन्य प्राण्यांचेही अस्तित्व दिसून येत आहे.

मार्चमध्ये उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरूवात झाल्यापासूनच विदेशी पाहुणे असलेल्या पक्ष्यांनी मुक्काम हलविण्यास सुरूवात केली होती. आता तर विदेशी पक्षी दिसणेही मुश्किल झाले आहे. यंदा पाऊसमान चांगले झाल्यामुळे धरणातील पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात स्थानिक पक्ष्यांनी आपला मुक्काम वाढविला आहे. धरणात गाळपेऱ्यापर्यंत पाणी असल्याने शेवाळयुक्त पाणी मासे आणि पक्ष्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत ५०० पेक्षा अधिक बगळे अद्याप धरण परिसरात मुक्कामी आहेत. काही स्थानिक पक्ष्यांनी घरटे बांधण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये हळदी कुंकू, वचंक, पानकाडी, जांभळी पाणकोंबडी, रंगीत करकोचा, चित्रांग या पक्ष्यांची घरटी दिसत आहेत. पहिल्यांदाच राखी करकोचाने आपले घरटे अभयारण्य परिसरात बांधले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिसरातील ऊस शेतीचा तसेच द्राक्ष पिकांचा हंगाम संपल्याने शेत परिसर ओसाड झाल्यामुळे यामध्ये लपलेले कोल्हेही अभयारण्यात येत आहे. अभयारण्याच्या दलदल परिसरातील माशांचा फडशा कोल्ह्य़ांकडून पाडला जात आहे. करोनाचा संसर्ग वाढत असल्याने पर्यटकांसाठी अभयारण्य बंद करण्यात आले आहे. परिस्थितीच बिकट असल्यामुळे पर्यटकांचे येणेही कमी झाले होते. पर्यटक येणे बंद झाल्याचा फटका येथील मार्गदर्शकांना बसला आहे. त्यांच्यावर जणूकाही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मुळात यंदा दोन ते तीन महिनेच पर्यटन सुरू राहिले. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न वन विभागाकडे जमा झाले आहे.  वन विभागाकडे जमा होणाऱ्या उत्पन्नातून मार्गदर्शकांचे वेतन दिले जाते. यंदा पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे आणि नंतर त्यांना येणेच बंद के ल्याने महसूल कमी मिळाला. परिणामी मार्गदर्शकांना मानधनापासून वंचित रहावे लागत आहे. पर्यटकांमध्ये हौशी मंडळींचा अधिक समावेश असतो. त्यामुळे पक्षी दिसले तरी त्याचे नाव, त्याची वैशिटय़े याविषयी त्यांना माहिती नसते. अशावेळी मार्गदर्शकांकडून मिळणारी माहिती त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असते. मार्गदर्शक टिकवून ठेवण्यासाठी वनविभागाने मार्गदर्शकांना या कठीण काळात मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी होत आहे.