नाशिक : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी नाशिक आणि देवळाली येथील तोफखाना स्कूल, तोफखाना केंद्र आणि हेलिकॉप्टर वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या लष्कराच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कुलला भेट दिली. प्रशिक्षणार्थीशी संवाद साधून प्रशिक्षण आणि प्रशासनविषयक कामकाजाचा आढावा घेतला.
लेफ्टनंट जनरल नैन यांनी गांधीनगर आणि देवळाली येथील प्रशिक्षण केंद्रांना भेट दिली. यावेळी नाशिकरोड येथील तोफखाना केंद्राचे प्रमुख ब्रिगेडियर ए. रागेश यांनी केंद्रात करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून सुरू असलेल्या प्रशिक्षण आणि प्रशासनविषयक उपक्रमांची माहिती दिली.
या केंद्रातील विविध विभागांमध्ये प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षण अधिकाऱ्यांशी नैन यांनी संवाद साधला. अतिशय समर्पित वृत्तीने सर्व जण करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. केंद्रातील प्रशिक्षणाचा उच्च दर्जा आणि प्रशासन व्यवस्था याबद्दल समाधान व्यक्त केले. अत्युच्च गुणवत्तेचा ध्यास घेऊन सदैव कार्यरत राहण्याची सूचना त्यांनी केली.
लष्कराच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेिनग स्कूलच्या भेटीदरम्यान या संस्थेच्या प्रमुखांनी संस्थेतील प्रशिक्षणासह विविध पैलूंची माहिती दिली. यावेळी त्यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी आणि कर्तव्याविषयी समर्पित वृत्तीने कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. हवाई प्रशिक्षण तळावरील सर्व श्रेणीच्या अधिकाऱ्यांशी संवाद झाल्यानंतर या भेटीचा समारोप झाला. नैन यांनी तोफखाना स्कूलला देखील भेट दिली. तेथील विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रशासनविषयक कामकाजाचा आढावा घेतला.