धुळे : जिल्ह्यातील चारही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही जिंकू आणि या सर्व चार ठिकाणी नगराध्यक्ष भाजपचेच असतील, असा ठाम विश्वास व्यक्त करून राज्याचे पणन व जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांनी विरोधकांना आव्हान दिले.
पालक मंत्री रावल यांनी दोंडाईचा येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने खास पिंपळनेर येथील राजकीय परिस्थिती बाबत मंत्री रावल यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेसचे माजी खासदार बापू चौरे हे पिंपळनेर येथील रहिवासी असून त्यांचे पुत्र प्रवीण चौरे हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आहेत. यामुळे प्रामुख्याने पिंपळनेर येथील पहिलीच निवडणूक काँग्रेस आणि आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. या अनुषंगाने मंत्री रावल हे पिंपळनेर येथील निवडणुकी बाबत काय भूमिका घेतात याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता लागून आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूका २०२५ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपरिषद, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद, पिंपळनेर नगरपरिषद, शिंदखेडा नगरपंचायतीसाठी मंगळवार ( दि.२ डिसेंबर, २०२५) रोजी मतदान तर दुसऱ्या दिवशी बुधवार (दि. ३ डिसेंबर, २०२५ ) रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने ४ नोव्हेंबर २०२५ पासून संबंधित कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
धुळे जिल्हयातील शिरपूर-वरवाडे, दोंडाईचा-वरवाडे व पिंपळनेर या तीन नगरपरिषद तसेच शिंदखेडा नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. या चारही नगरपरिषद व नगरपंचायती मध्ये एकूण मतदारांची संख्या एक लाख ५७ हजार ५९२ इतकी असून यात पुरुष मतदारांची संख्या ७९ हजार ५७६ तर स्त्री ७८ हजार १४ तर तृतीयपंथी मतदार ११ आहेत. यासाठी एकूण १८३ मतदान केंद्र निश्चित करण्यांत आलेले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेवाबत एकत्रित आदेश पारित केलेले आहेत. यामुळे जिल्हयातील शस्त्रधारकांची शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरु आहे. सर्व नागरिक तसेच सर्व राजकीय पक्षानी आचार संहितेचे पालन करावे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी यापूर्वीच केल्याने राजकीय नेते, मंत्री कार्यकर्ते आणि एकूणच यंत्रणेतील व्यक्ती या आदेशाचे पालन करीत राजकीय वक्तव्य करीत असल्याचे दिसते.
पालक मंत्री रावल म्हणाले, जिल्ह्यातील शिंदखेडा, दोंडाईचा- वरवाडे, पिंपळनेर आणि शिरपूर – वरवाडे आदी चारही ठिकाणी भाजपची सत्ता राहील.नगराध्यक्ष भाजपाचे राहतीलच, पण या संस्थांमध्ये शत प्रतिशत भाजपचेच नगरसेवक असतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पिंपळनेर येथे महायुतीचे पॅनल आहे.नगराध्यक्ष, कार्यकर्ते आणि आमदार आहेत. आम्ही तेथील लोकांना आवश्यक ती सूचना दिली आहे यामुळे चर्चा सुरू आहे. ती शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहील.त्यातून मार्ग निघाल्यास युती होईल अन्यथा प्रेमाने निवडणूक देखील होईल.
