धुळे : दोंडाईचा शहरातील तब्बल तीन पिढ्यांपासून सुरू असलेला रावल–देशमुख गटातील राजकीय संघर्ष अखेर थांबला असून माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख, जावई तसेच समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. राज्याचे पणन व जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांनी या प्रवेशाचे स्वागत करत हा निर्णय दोंडाईचा तसेच संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या दुप्पट विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

जिल्हा दौऱ्यावर असताना पालक मंत्र्यांनी प्रथमच रावल–देशमुख संघर्षावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, विकासाच्या कामांना अडथळे आणणारा राजकीय संघर्ष आता संपुष्टात येणे आवश्यक होते. माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी चांगल्या कामाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील विकासाची गती अधिक वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही माजी मंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची दखल घेत, हा संघर्ष संपल्याने दोंडाईचाला निश्चितच विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असे त्यांनी नमूद केले.

दोंडाईचाच्या राजकीय इतिहासात शहरातील अंतर्गत विकासकामांना संघर्षामुळे अडथळे आले होते. प्रसंगी कायद्याचा आधार घेत प्रकल्प थांबविण्याची उदाहरणेही घडली. परंतु पुढील पिढीने संघर्षापेक्षा सहकाराची गरज ओळखल्याने दोन्ही गटांतील दुरावा कमी होत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख आणि त्यांच्या समर्थकांचा झालेला भाजपा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरतो. या निर्णयाबाबत बोलताना पालक मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास परिपक्व आहे.

येथे विरोधक म्हणजे शत्रू नसून केवळ वैचारिक मतभेद असतात. विकासाच्या कामात अडथळा न आणता त्याला पाठिंबा देण्याची भावना सर्वांनी स्वीकारणे हीच खरी प्रगल्भता आहे. दोंडाईचातील संघर्ष आता सहकार्याच्या मार्गावर आला असून विकासासाठी सर्व पातळ्यांवर एकत्रित प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपाची २७ जागांवर उमेदवारी राहील, तसेच मित्रपक्षांसोबत समन्वयातून काही ठिकाणी संयुक्तरीत्या काम होईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. हेमंत देशमुख, रवींद्र देशमुख आणि त्यांच्या समर्थकांचा भाजपा प्रवेश हा दोंडाईचासह संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ देणारा निर्णय ठरेल, असा विश्वास पालक मंत्री रावल यांनी व्यक्त केला. ही घडामोड स्थानिक राजकारणात महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात असून येत्या काळात विकास प्रकल्पांना मोठी चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.