आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन मनसेने प्रदीर्घ काळापासून रखडलेली स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी अखेर शुक्रवारी जाहीर केली. नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत चाललेली चर्चा थांबविण्यासाठी सर्वाचे समाधान करण्यावर पक्षाच्या नेत्यांनी कटाक्ष ठेवल्याचे दिसते. शहराध्यक्षपदाची धुरा राहुल ढिकले यांच्याकडे सोपविली आहे. या जम्बो कार्यकारिणीत ९२ जणांना स्थान देण्यात आले आहे.
नाशिक शहरात पक्षाच्या स्थानिक पातळीवर काही नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर मनसेचे नगरसेवक फोडण्याकडे लक्ष केंद्रित केले. या स्थितीत पक्षातील सर्व घटकांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न जाहीर झालेल्या शहर कार्यकारिणीच्या संख्याबळावरून लक्षात येतो. शहराध्यक्षपदी एकाची निवड असली तरी १२ जण उपशहराध्यक्ष आहेत. २९ शहर संघटक, २६ शहर चिटणीस, १४ शहर सरचिटणीस असतील. मनसेच्या राजगड कार्यालयात नवी कार्यकारिणी संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी जाहीर केली. या वेळी नियुक्तीपत्रेही देण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी शहराचा विकास आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम करावे असे या वेळी सूचित केले.