अनिकेत साठे

आदिवासींना श्रीमंतीकडे नेणारा सुगंधी मार्ग

ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे अशा बिकट स्थितीतही पिकवलेल्या भाजीपाला आणि अन्य कृषिमालास अपेक्षित भाव मिळत नसल्याने यातून बोध घेत ४० आदिवासी शेतकऱ्यांनी मोगरा फुलशेतीकडे मोर्चा वळवला आहे. पाण्याची उपलब्धता पाहून पेठ तालुक्यात संबंधितांनी एकूण २० हजार रोपांची लागवड केली आहे. या शेतीमुळे आदिवासी भागात मोगऱ्याचा सुगंध दरवळत आहे. उत्पादित मोगऱ्याच्या कळ्या शहरातील फूल बाजारात विकल्या जातात. मोगरा फुलशेतीचा प्रयोग आदिवासी शेतकऱ्यांना ‘श्रीमंत’ करण्याच्या मार्गावर आहे.

ग्रामीण भागात शेती व्यवसाय आतबट्टय़ाचा ठरल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटते. कांदा, द्राक्ष, डाळिंब वा भाजीपाला आदींना भाव मिळत नाही, उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची तक्रार शेतकरी वर्ग करतो. यंदाच्या दुष्काळात जगवलेल्या पिकांची वेगळी अवस्था नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या स्थितीचा साकल्याने विचार करत पेठ तालुक्यातील श्रीमंत आदिवासी सेिंद्रय शेतकरी गटाने मोगरा शेतीचा प्रयोग प्रत्यक्षात आणला. या गटात शेकडो आदिवासी शेतकरी समाविष्ट आहेत. त्यांच्यामार्फत हातसडी तांदूळ, ब्राऊन तांदूळ – इंद्रायणी, नागली, गहू, वरई, भगर, कुळीद, उडीद, दाळ, आंबा आदी सेंद्रिय पध्दतीने पिकविण्याचे काम आधीपासून होत आहे. जिल्ह्य़ात अन्नधान्य, फळे, भाजीपाला उत्पादन विपूल आहे. त्यातून जादा भाव किंवा नफा मिळणे अवघड आहे. हे जाणून गटाने मोगरा फुलशेतीचा अभ्यास केला. इतर पिकांच्या तुलनेत ती फायदेशीर ठरू शकते, हे लक्षात घेत मोगरा रोपे लागवडीचा मार्ग स्वीकारल्याचे श्रीमंत शेतकरी गटाचे अध्यक्ष यशवंत गावंडे यांनी सांगितले.

पेठ तालुक्यातील करंजाळी, शिंगदरी जळीतहोडसह आसपासच्या गावातील ३५ ते ४० शेतकरी या प्रयोगात सहभागी झाले आहेत. जव्हार भागात मोगऱ्याची शेती केली जाते. तेथे जाऊन गटाने अभ्यास केला. मार्गदर्शन घेतले. नंतर श्रीमंत आदिवासी गटाने सर्वाना रोपे उपलब्ध करून दिली. उन्हाळ्यात पेठ तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. किती पाणी उपलब्ध राहील, याचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्याने दोन, चार ते सहा गुंठा जागेत मोगरा रोपांची लागवड केली. त्यातून मोगऱ्याचा सुगंध दरवळत आहे. प्रत्येकाचे क्षेत्र कमी असल्याने दररोज निघणारा माल अधिक नसतो. तो विक्रीसाठी शहरात नेणे प्रत्येकाला परवडणारे नाही. यावर गटाने तो एकत्रितपणे विक्रीला नेण्याचा तोडगा शोधला. मध्यवर्ती करंजाळी गावात प्रत्येक शेतकरी आपला माल मोजून गटाकडे जमा करतो. सर्वाकडून संकलित झालेल्या मोगऱ्याच्या कळ्या गटातील एक शेतकरी शहरातील फुल बाजारात विक्रीसाठी नेतो, असे गावंडे यांनी सांगितले. बाजारात जो भाव मिळेल, त्याआधारे प्रत्येकाला नंतर आपल्या मालाचे पैसे दिले जातात. प्रारंभीच्या उत्पन्नावरून मोगरा शेती फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

भाजीपाल्याच्या तुलनेत फायदेशीर कशी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोगरा कळ्यांना बाजारात चांगली मागणी आहे. लग्नसराई, सणोत्सवाच्या काळात मागणी वाढून दर उंचावतात. सर्वसाधारणपणे किलोला किमान ३०० ते अधिकतम हजार ते १२०० रुपयांपर्यंत भाव मिळतो. मोगरा रोपाची एकदा लागवड केली की, पुढील १० ते १२ वर्षे ते उत्पादन देते. वर्षभरात सलग आठ महिने मोगऱ्याचा हंगाम असतो. भाजीपाल्याचा विचार केला तर त्यांचा हंगाम केवळ एक-दोन महिन्यापुरताच मर्यादित आहे. मोगऱ्याच्या एका झाडातून दररोज १०० ते १५० ग्रॅम कळ्या मिळतात. ५०० रोपांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला दररोज १० ते १५ किलो मोगरा कळ्यांचे उत्पादन मिळते. किमान भाव मिळाला तरी भाजीपाला, तत्सम पिकांच्या तुलनेत मोगरा शेती फायदेशीर ठरते, याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले.