काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश यांचे मत

विधानसभा निवडणुकीत गुजरातची जनता विरूध्द नरेंद्र मोदी असा सामना आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारविरूध्द सर्वच घटकांमध्ये नाराजी असल्याने मतदान यंत्रांमधील करामतच गुजरातमध्ये भाजपला वाचवू शकेल, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी मांडले.

रविवारी संविधान दिनानिमित्त येथे शहर काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी मोहन प्रकाश आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान यंत्रांमधील फेरफारचा मुद्दा मांडला. आजपर्यंत भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी कधी ना कधी मतदान यंत्रांविषयी साशंकता व्यक्त केली आहे. लोकशाहीत विश्वास महत्वाचा असतो. त्यामुळेच लोकांच्या विश्वासासाठी गुजरातच्या निवडणुकांमध्ये यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची गरज असल्याचे मोहन प्रकाश यांनी नमूद केले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ मांडले होते. त्याच गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. व्यापारीवर्गही नाराज आहे. त्यामुळेच मतदान यंत्रांमध्ये काही करामत झाली तरच भाजपला यश मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कधीच सहभाग नव्हता. स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढणारा एक वर्ग अंगात खादीचा शर्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी असा पेहराव करून रस्त्यावर उतरत होता, तर दुसरीकडे काळी टोपी घालून एक वर्ग वावरत होता, अशी टीकाही मोहन प्रकाश यांनी केली. अलीकडे देशाच्या संविधानाला चहुबाजूंनी धोका निर्माण झाला असल्याचे वाटत असल्याने संविधानाच्या सुरक्षिततेसाठी, त्याचे महत्व अबाधित राहावे म्हणून काँग्रेसच्या वतीने संविधानविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.