२६ जुलै रोजी राज्यस्तरीय

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात परिचारिकांना मदत करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांना दरमहा तीन हजार रुपये तुटपुंजे वेतन मिळत असून त्यांच्यावर वेठबिगाराचे जीवन जगण्याची वेळ आल्याची तक्रार अंशकालीन स्त्री परिचर संघटनेने केली आहे. अंशकालीन स्त्री परिचरांना १८ हजार रुपये वेतन मिळावे, यासह अन्य प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जुलै रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबतची माहिती आयटक संलग्न अंशकालीन स्त्री परिचर संघटनेकडून देण्यात आली. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंशकालीन स्त्री परिचरांना त्यांच्या कामाच्या तुलनेत मिळणारे एकत्रित वेतन अतिशय कमी आहे. राज्य सरकार दरमहा २९०० आणि केंद्र सरकार १०० असे एकूण तीन हजार रुपये मिळतात. या विरोधात आंदोलन  करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य संचालकांनी स्त्री परिचरांना १० हजार रुपये एकत्रित वेतन देण्याची शिफारस केलेली आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.

आरोग्य खात्यात अन्य कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी सहित बरेच आर्थिक लाभ मिळतात. पण समान कामाला समान वेतन हे सूत्र स्त्री परिचरांना डावलले जाते. संबंधितांना जिल्हा परिषद सेवेत कायम करावे, करोनाचा भत्ता द्यावा, वारसांना सेवेत घ्या, निवृत्ती वेतन योजना लागू करावी, गणवेश उपलब्ध करावेत, आदी मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. ऑगस्टमध्ये जालना येथील आरोग्य मंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.  या बाबतची माहिती संघटनेचे राज्य सचिव राजू देसले, जिल्हा सचिव चित्रा जगताप, संघटक राजू निकम, सहसचिव हसीना शेख, अंजना काळे, कमल माळी आदींनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement part time female attendant questions ssh
First published on: 20-07-2021 at 01:11 IST