प्रसाद माधव कुलकर्णी
महात्मा ज्योतिबा फुले यांचा ११ एप्रिल, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन. महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकर आपले गुरू मानत होते. महात्मा फुले १८२३ साली जन्मले तर डॉ.आंबेडकर १८९१ मध्ये. त्यांच्यात तब्बल ६६ वर्षांचे अंतर होते. फुले कालवश झाले तेव्हा बाबासाहेब तीन वर्षांचे होते. या दोन्ही महामानवांच्या विचारांची झेप फार मोठी होती. समाज परिवर्तन का आणि कशासाठी करायचे याबाबतच्या त्यांच्या भूमिका पक्क्या होत्या. आज समाजामध्ये जातजाणिवा पातळ होण्याऐवजी बळकट होताना दिसत आहेत. जाती व धर्माच्या प्रश्नांना जगण्याच्या प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे ठरवत त्यावर आधारित राजकारण केले जात आहे. हे आमच्या पुरोगामीपणाचे खचितच लक्षण नाही. म्हणूनच या दोन महामानवांनी जातीअंता बाबतची जी भूमिका मांडलेली आहे ती ध्यानात घेणे आणि तिचा अंगिकार करणे ही काळाची गरज आहे. या महामानवांचे जन्मदिन साजरे करत असताना तीच त्यांना खरी आदरांजली ठरू शकेल.

इंग्रजी सत्ता, दारिद्रय़, रोगराई, दुष्काळ, सावकारी फास, गुलामगिरी, शेतकऱ्यांची होरपळ आदी कारणांनी पिचत चाललेल्या समाजाला महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा कृतिशील प्रयत्न केला. शिक्षणापासून ते लेखनापर्यंतच्या आणि स्त्री मुक्तीपासून ते सत्यशोधक समाजापर्यंतच्या अनेक क्षेत्रात फुल्यांनी उत्तुंग कामगिरी केली. आज राजकारणापासून कलेपर्यंतची सर्व क्षेत्रे आज जात्यंध व धर्माध विचारांनी प्रदूषित केली जात, आपण जातीअंतासाठी त्यांनी केलेल्या कामाचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे.

ajit pawar
“मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो”; ‘या’ नेत्याने दिला इशारा
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
‘लय फडफड करत होता’; मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
Narendra Modi and prakash ambedkar
“भारतीय मुसलमान घुसखोर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका; काँग्रेसलाही केलं लक्ष्य!
ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”
Navneet Rana and Bacchu kadu
काल राडा, आज सभा: अमित शाहांच्या प्रचारसभेआधीच नवनीत राणा-बच्चू कडू यांच्यात शाब्दिक चकमक!
Loksatta samorchya bakavarun opposition parties Prime Minister Narendra Modi campaign
समोरच्या बाकावरून: ‘५६ इंची छाती’च्या नेत्याने खोटे का बोलावे?
Amit Shah viral video FIR
अनुसूचित जाती-जमातींचं आरक्षण रद्द होणार? अमित शाहांच्या ‘त्या’ व्हायरल VIDEO प्रकरणी गुन्हा दाखल!
rohit pawar on ajit awar
“शरद पवारांच्या व्याधीवर कुणी बोललं नाही, कारण…”, अजित पवारांसमोरच वक्त्याचं विधान; रोहित पवार म्हणाले, “समोर असता तर कानाखाली…”!

हेही वाचा >>>नाही… मुस्लीम लीगची नाही, मोदींची झाक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात!

महात्मा फुले यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती विरोधात आवाज उठवला. जातिव्यवस्थेवर प्रहार केला. त्यांनी पुनर्विवाहाला दिलेल्या प्रोत्साहनापासून विधवांच्या संततीच्या बालकाश्रमापर्यंतचे केलेले उपक्रम ही जातीअंतासाठीची महत्त्वाची पावले मानावी लागतील. तुकाराम तात्या पडवळ यांच्या ‘जातिभेद विवेकसार’ या पुस्तकाची महात्मा फुल्यांनी दुसरी आवृत्ती स्वत: काढली होती. ‘मी कोणत्याही व्यक्तीच्या हातचे अन्न ग्रहण करेन’ असे म्हणणाऱ्या व तसे वागणाऱ्या महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांसाठी स्वत:च्या वापरातील पाण्याचा हौद खुला केला होता. विधवांच्या केशवपन विरोधी यांनी आवाज उठवला होता. तसेच वैचारिक दास्यातून समाजाची सोडवणूक व्हावी म्हणून ‘गुलामगिरी’ सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला. तसेच समतेचा विचार देणाऱ्या सत्यशोधक समाजाची भूमिका त्यांनी मांडली. हे जग निर्माण करणारा कोणीतरी निर्मिक मानता येईल, परंतु कोणताही धर्म अथवा धर्म ग्रंथ ईश्वराने निर्माण केला नाही. इथला जातीभेद, वर्णव्यवस्था ही तर माणसाने स्वार्थी हेतूने निर्माण केली आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते.

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. त्यात त्यांची मूलगामी तत्वधारा दिसते. ख्यातनाम चरित्रकार धनंजय कीर यांनी या पुस्तकाला ‘विश्व कुटुंबवादाची गाथा’ म्हटले आहे. सर्व प्रकारची विषमता ही मानव निर्मित आहे म्हणून ती आपणच नष्ट केली पाहिजे. व समता प्रस्थापित करण्यात पुढाकार घेतला पाहिजे, ही त्यांची तळमळ फार महत्त्वाची होती. जातिव्यवस्थेचा दाहकपणा समाजाचे स्वास्थ्य घालवतो, त्यामुळे जातीअंताची भूमिका महात्मा फुले अग्रक्रमाने मांडत राहिले .

हेही वाचा >>>जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?

हीच भूमिका त्यांचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी अधिक अभ्यासपूर्ण आणि तपशीलवार पद्धतीने मांडलेली आहे.डॉ.आंबेडकर हे प्रखर बुद्धिवादी विचारवंत होते. या महामानवाने देशातील कोटय़वधी जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या समाजात त्यांनी वैचारिक जागृती घडवून आणली. सामाजिक समतेचे आंदोलन प्राणपणाने लढणाऱ्या डॉ. बाबासाहेबांचे राजकीय व शैक्षणिक कार्य अतिशय व्यापक स्वरूपाचे आहे. स्वतंत्र भारताला आदर्श राज्यघटना देण्यामध्ये त्यांचे योगदान फार मोठे आहे, अग्रक्रमाचे आहे.

आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव झाला, राज्यघटनेचा अमृत महोत्सव सुरू असताना समाजाची वाटचाल जातीअंताऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसत आहे. आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी काही पक्ष, संघटना जात जाणीवा बळकट करण्याची नियोजनबद्ध कारस्थाने रचत आहेत.त्यासाठी समाजाला वेठीला धरले जात आहे. हे सारे सामाजिक दृष्टय़ा अतिशय हानिकारक आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांचे जातीसंस्थेचे विश्लेषण आणि जातिसंस्था नष्ट करण्याचे मार्ग आपण समजून घेतले पाहिजेत. १९१६ साली डॉ. आंबेडकरांनी ‘भारतातील जातीसंस्था, तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास’ हा लेख लिहून जातीसंस्थेचे विश्लेषण मांडले. जातीसंस्था ही मानवनिर्मित- म्हणून कृत्रिम आहे.

जातीबद्ध विवाहसंस्था हा तिचा मुख्य आधार आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. ‘अनुकरणाचा संसर्गदोष’ हा सिद्धांत त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी मांडला आहे.

त्यांच्या मते, जगातील सर्व समाज हे वर्गीय समाज होते. त्या वर्गाचा आधार आर्थिक, बौद्धिक किंवा सामाजिक होता. समाजातील व्यक्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी वर्गाची घटक असते; ही जागतिक वस्तुस्थिती असल्याने हिंदू समाजही त्याला अपवाद नव्हता. भारत सोडून अन्यत्र समाजातील वर्ग मुक्त राहिल्याने ते समाज परिवर्तनीय राहिले. परंतु भारतातील वर्ग बंदिस्त केले गेल्यामुळे भारतात जाती निर्माण झाल्या. जात म्हणजे बंदिस्त वर्ग.भारतीय समाजात वर्गाला बंदिस्त करण्याची प्रक्रिया तत्कालीन उच्चवर्णीयांनी सुरू केली. त्याचे अनुकरण इतर खालच्या वर्णानीही केले. डॉ.आंबेडकर म्हणतात :  जातीसंस्था ही मनूने निर्माण केलेली नसून ती त्याच्यापूर्वी फार वर्षे अस्तीत्वात होती. मनू हा केवळ जातिव्यवस्थेला तात्त्विक रूप देणारा तिचा प्रचारक होता. जातीव्यवस्था ही उपदेशातून निर्माण झालेली नाही. आणि उपदेशातून ती नष्टही होणार नाही. हे स्पष्टपणे सांगून आंबेडकरांनी जातीसंस्थेच्या उत्पत्तीत केंद्रिबदू असलेल्या व्यवसाय, वर्गीय संस्था, नव्या श्रद्धा, देशांतर आदी मुद्दय़ांकडेही ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ (जातीचा उच्छेद) मध्ये लक्ष वेधले आहे.  जातीसंस्था ही श्रमविभागणी नसून श्रमिकांचीसुद्धा विभागणी असल्याने ती कृत्रिम आहे. त्यामुळे हिंदू जनसमुदाय ‘समाज’ या संस्थेलाच प्राप्त होऊ शकला नाही. हिंदू समाज म्हणजे विविध जातींचा एक पुंजका होय. हिंदू समाजाचे हे स्वरूप व्यक्ती विकासाला आणि उत्पादन पद्धतीला मारक आहे, या अर्थाचे डॉ. आंबेडकरांचे विश्लेषण ध्यानात घेतले की, आज विविध मार्गानी होणारी जातीय संमेलने व जातजाणिवा बळकट करण्याचे उपक्रम सामाजिक ऐक्याला तडा देणारे आहेत हे स्पष्ट होते. जातीसंस्थेने बद्ध झालेल्या हिंदू समाजात एका नव्या प्रबोधन चळवळीची त्यांना गरज वाटत होती.या प्रबोधनाची व्याप्ती सखोल असली पाहिजे ही त्यांची धारणा होती. जातिसंस्था नष्ट करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून आंतरजातीय विवाहाकडे डॉ.आंबेडकर पाहताना दिसतात.

जातिसंस्था नष्ट करायची असेल तर प्रथम धर्माचे आणि त्याच्या गुंतागुंतीचे स्वरूप समजून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यातूनच त्यांनी धर्माची समीक्षा केलेली दिसते. त्यांनी म्हटले आहे, ‘ज्या क्षणी धर्माचे रूपांतर तत्वाऐवजी कायद्यात होते, त्याच क्षणाला तो धर्म भ्रष्ट होतो. आणि असा भ्रष्ट खऱ्या धार्मिक संकल्पनेचा आवश्यक गुणच मारून टाकतो.’ १९३५ साली डॉ. आंबेडकरांनी धर्मातराची घोषणा केली. जीवन आणि वास्तव यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आणि विचारात बदल करणे म्हणजे धर्मातर ही त्यांची भूमिका होती. डॉ.आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेचीही सखोल समीक्षा ‘ शूद्रपूर्वी कोण होते ? ‘या ग्रंथात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी धर्मातर केले.त्यापूर्वी त्यांनी अनेक धर्माचा व राजकीय विचारांचा अभ्यास केला होता.साम्यवाद आणि बौद्धधर्म या दोन महत्त्वाच्या तत्त्वप्रणाली आहेत यावर ते ठाम होते. बुद्ध की कार्ल मार्क्‍स या लेखात आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात त्यांनी त्याची चर्चाही केलेली आहे.डॉ.आंबेडकर यांनी धर्म आणि धम्म या दोन संकल्पनांची सखोल चर्चा केली आहे.त्यातील भेद स्पष्ट केला आहे .त्यांच्या मते धर्म हा वैयक्तिक असून धर्म हा मूलत: सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण व जीवनातील सर्व क्षेत्रात माणसामाणसातील व्यवहार उचित असणे होय. धर्म या कल्पनेत वस्तुजाताच्या आरंभाच्या साक्षात्काराला महत्त्व दिले जाते. तर धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना हे आहे. नीती हे धम्माचे सार आहे.डॉ. आंबेडकरांनी पारंपारिक बौद्ध धर्माची नव्याने मांडणी केली.

जातीअंतासाठी धर्मसुधारणा, हे म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांतील साम्य. तो विचार आज कसा पुढे नेणार, यावर व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे.

( लेखक हे ‘समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी’चे ज्येष्ठ कार्यकर्ते व  ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत)